चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदासह पूर्ण बहुमत मिळवत शिवसेनेने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखली आहे. मागील २० वर्षांपासून या नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. २७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत १६ जागा मिळवत शिवसेनेने पूर्ण बहुमत मिळवले. तर भाजपाला फक्त चार जागा मिळाल्या आहेत. विदर्भ म्हणजे भाजपाचा बालेकिल्ला किंव गड मानला जातो. मात्र याच ठिकाणी भद्रावती नगर परिषदेवर शिवसेनेने सलग पाचव्यांदा विजय मिळवला.

नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिवसेना उमेदवार अनिल धानोरकर यांनी भाजपाच्या सुनील नामोजवार यांचा ३६१६ मतांनी पराभव केला. शिवसेनेला १६, भाजपाला ४, काँग्रेसला २, भारिप बमसं ला ४ तर अपक्षांना १ जागा मिळाली. सलग पाचव्यांदा विजय मिळवत शिवसेनेने इतिहास रचला आहे. भद्रावतीमधल्या नागरिकांसाठी आम्ही सातत्याने झटतो आहोत त्याचेच फळ आम्हाला मिळाले आहे अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी दिली.