सबनीस यांचा प्रश्न
सनातनने दिलेल्या धमकीनंतर आपल्याला देण्यात आलेले पोलीस संरक्षण ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब असून युतीचे शासन सनातनवादी आहे काय, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी येथे केला. शेतकरी आत्महत्येवरून सर्वच पक्षांवर टीकास्त्र सोडत रविवारी येथे आयोजित नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनात त्यांनी सकस साहित्य निर्मितीसाठी निर्दोष विचारबीज कलाकृतीत उतरविण्याची गरज व्यक्त केली.
येथील शिवाजी नाटय़ मंदिरात आयोजित सहाव्या नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनास सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक दिनानाथ मनोहर होते. संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर आदिवासी संस्कृतीत राहिल्यानेच आपल्यातील इमान पन्नास टक्के जिवंत असल्याचे नमूद करत सबनीस यांनी नथुराम गोडसेंसारख्या व्यक्ती आणि विचार देशास घातक असल्याचे सांगितले. शेतकऱ्याच्या आत्महत्येची लाज वाटू नये ही तर सरकारची परंपराच आहे; परंतु सर्वानी याप्रकरणी संवेदनशीलता दाखवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संघाच्या शाखेत आपण अर्धी चड्डी आणि काळी टोपी घालून गेलो नाही हाच का आपला गुन्हा, असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्राची संस्कृती इतकी कमकुवत कशी झाली, अशी विचारणा सबनीस यांनी केली. इसिसचा वाढता प्रभाव धोकादायक आणि इस्लामविरोधात आहे. इसिसकडे ओढल्या जाणाऱ्या तरुणांना जवळ करून त्यांच्यात नवी आशा जगवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रादेशिक परंपरांवर लिहिण्याची गरज असून साहित्याच्या समृद्धीसाठी आदिवासीबहुल भागातील संस्कृतीचे लढे वाचकांसमोर येणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनातील आपले अध्यक्षीय भाषण न छापणे हे साहित्य महामंडळाच्या तीन-चार जणांच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. हे सर्व षड्यंत्र असून सांस्कृतिक मंत्र्यांनी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना निवृत्तीनंतर सांस्कृतिक विभागात देऊ केलेल्या नोकरीच्या आमिषातून हा कट रचला गेला असल्याचा संशयही सबनीस यांनी व्यक्त केला. सकाळी तालुका क्रीडा संकुलापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली. नंदुरबारचे जिल्हाधिकारी प्रदिप पी. हेही यावेळी उपस्थित होते.