अन्नातून विषबाधा झाल्याने लहान बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी तासगाव तालुक्यातील सावळज येथे घडली. कर्नाटकातून रोजगारासाठी वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील ही दोन मुले असून भावंडांची आई मुलांना घरी ठेवून रोजगारासाठी शेतात गेली असताना ही घटना घडली. रात्री शिल्लक राहिलेला शिरा खाल्ल्याने ही विषबाधा झाली असावी असा संशय असून रासायनिक तपासणीसाठी शिऱ्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की, काल सकाळी निखिल (वय ६)  आणि श्रावणी शिवानंद व्हळकल्ले (वय ३) ही दोन मुले अंगणात खेळत असताना तीन वर्षांच्या श्रावणीला उलटय़ा होऊ लागल्या. यामुळे तिला खासगी रूग्णालयात तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने सांगलीला पाठविण्यात आले. सांगलीच्या शासकीय रूग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, श्रावणीला वाचविण्याच्या प्रयत्नात असतानाच तिचा भाऊ निखिल या ६ वर्षांच्या मुलालाही उलटय़ा होऊ लागल्या. त्यालाही उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. याबाबत काल रात्री उशिरा तासगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. पोलिसांनी तपासणीसाठी घरातील शिऱ्याचे नमुने जप्त केले आहेत.