जिल्ह्यात ५१५ तीव्र आणि ५५८९  रुग्ण

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : पालघर जिल्ह्य़ातील सिकलसेल आजार असणाऱ्यांना करोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच या रुग्णांवर  होणारे उपचार आणि चाचण्या गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने संकट वाढले आहे. जिल्ह्य़ात ५१५ तीव्र आणि ५,५८९ सिकलसेलचे रुग्ण आहेत, अशी माहिती देण्यात येते.

करोना संक्रमणाच्या काळात सिकलसेल रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.   केंद्र व राज्य सरकारच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर जिल्ह्य़ात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून २००८ पासून सिकलसेल कार्यक्रम राबवला जात होता. पालघर जिल्ह्य़ात तीव्र आणि सौम्य असे सहा हजार सिकलसेल रुग्ण आहेत,  तर राज्यात इतर सात जिल्ह्य़ांत ११ हजार तीव्र आणि ३२  हजार वाहक रुग्ण संख्या आहे.

या वर्षी आरोग्य सेवा व अभियान  कार्यक्रम आयुक्तांनी संपुष्टात आणला आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात ५२ आरोग्य सेवक केवळ सहा हजार मानधनावर काम करीत आहेत. २००८ पासून सिकलसेल आजार नियंत्रण अभियानामध्ये १२ वर्षांच्या सेवेनंतर एप्रिलपासून अचानक सेवा समाप्त केल्याने सात जिल्ह्य़ातील शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. हा कार्यक्रम आशा कार्यकर्त्यांमार्फत राबवण्याचा शासनाचा विचार असला तरी प्रत्यक्षात सिकलसेल रुग्णांना उपचार मिळत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे. करोना आजाराने थैमान घातले असताना अचानक सिकलसेल कार्यक्रम संपुष्टात आणल्याने सिकलसेल रुग्ण दुहेरी संकटात सापडले आहेत. कार्यक्रमात तीव्र सिकलसेल असलेल्या रुग्णांना प्रथिने,  स्निग्ध पदार्थ, नियंत्रित आहार आणि औषधे मिळण्याबाबत सिकलसेलचे आरोग्य सेवक लक्ष देत असतात. त्यांना नियमित फॉलीकअसिडच्या गोळ्या दिल्या जातात. यामुळे हा अजार नियंत्रणात आणला जात असतो.

जिल्ह्य़ात वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी या भागांत सिकलसेल आजाराचे प्रमाण जास्त आहे. जेष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्तींसह रक्तामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असलेल्या सिकलसेल रुग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने त्यांना देखील करोना संसर्गाची भीती आहे.

सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम संपुष्टात

आरोग्य विभाग व अभियान आयुक्त यांनी करोना संक्रमणाच्या काळातच जिल्हयासह राज्यातील सहा जिल्ह्य़ात सुरू असलेला सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम संपुष्टात आणला आहे.  अभियानामध्ये बारा वर्षांपासून काम करणारे कर्मचाऱ्यासह सिकलसेल रुग्ण संकटात सापडले आहेत. सिकलसेलग्रस्त रुग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम हाती घेतला नाही.  करोनाने थैमान घातले असताना सिकलसेल रुग्णांची तपासणी केंद्र आणि उपचार केंद्र बंद असल्याने सिकलेसल रुग्ण भीतीचे छायेत आहेत.