मी कोण आणि कोण झाले आहे? ताई आणि ताईसाहेब यातील अंतर कापताना मी अनेकदा संपले व जन्म घेतले. ज्या नावाने महाराष्ट्र गाजवला, राजकारणात अढळ स्थान निर्माण केले, अनेक संस्था जोडल्या गेल्या, कित्येक घरे वसवली, भविष्ये घडवली. त्या नावाने म्हणजे ‘गोपीनाथ मुंडे’ अशी सही कोण करणार, या प्रश्नाने मन अस्वस्थ झाले. त्यामुळेच मी पुन्हा ‘पंकजा गोपीनाथ मुंडे’ असे नाव लिहिणार, तशीच सही करणार, असे मुंडे यांच्या वारस आमदार पंकजा पालवे यांनी म्हटले आहे. पती अमित पालवे यांच्या संमतीनेच हा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.
गोपीनाथ मुंडे यांचे ३ जूनला अपघाती निधन झाल्यानंतर त्यांची ज्येष्ठ कन्या, परळी मतदारसंघाच्या आमदार पंकजा पालवे-मुंडे राजकीय वारस म्हणून पुढे आल्या आहेत. मृत्यूपूर्वी दोन दिवस श्रीक्षेत्र भगवानगडावर मुंडे यांनी आपली वारस म्हणून पंकजाचे नाव जाहीर केले. अपघाती मृत्यूनंतर सर्व विधी पंकजा यांनीच पूर्ण केले. तब्बल महिनाभर देशभरातून आलेल्या लोकांकडून सांत्वन स्वीकारल्यानंतर पंकजा यांनी मुंडे यांचा राजकीय संघर्षांचा वारसा पुढे चालवण्याची घोषणाही भाजपच्या प्रदेश बठकीतच केली.
अलीकडेच सोशल मीडियावरून पंकजा यांनी संदेश पाठवून यापुढे आपण पंकजा पालवे-मुंडे या नावात बदल करून आमदार पंकजा गोपीनाथ मुंडे असे नाव लिहिणार असल्याचे स्पष्ट केले.