रत्नागिरी जिल्ह्यात दुहेरी चाचण्यांमुळे करण्यात करोनाबाधितांचा गेल्या आठवडय़ात सतत वाढत राहिलेला आकडा गेले तीन दिवस शंभराच्या आसपास राहिला असून त्यातही रत्नागिरी, खेड, चिपळूण हे तालुके वगळता त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही.

गेल्या रविवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये एकूण १०६ करोनाबाधित रूग्ण निष्पन्न झाले होते. त्यानंतर गेल्या सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी दुपारी ४ वाजेपर्यंतच्या सुमारे दीड दिवसात मिळून तितकेच, १०६  नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५६ एकटय़ा रत्नागिरी तालुक्यातील असून त्या खालोखाल नेहमीप्रमाणे खेड (२०)आणि चिपळूण (१५) तालुक्यांमध्ये जास्त रूग्ण सापडले आहेत. तसेच या १०६ रूग्णांपैकी आरटी—पीसीआर या सखोल चाचणीद्वारे फक्त२२ रूग्ण सापडले आहेत, तर उर्वरित ८४ रूग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीद्वारे निष्पन्न झाले आहेत. या प्रकारच्या चाचणीतील बहुसंख्य रूग्ण कोणतीही लक्षणे नसलेले किंवा अतिशय सौम्य लक्षणे असलेले असतात, असा अनुभव आहे.

रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसाठी गेले पाच दिवस राबवण्यात आलेल्या चाचणी मोहिमेत एकूण ४५ व्यापारी आणि कामगार बाधित असल्याचे पुढे आले आहे.

दरम्यान, गेल्या ५ महिन्यांमध्ये मिळून जिल्ह्यातील बाधितांच्या एकूण संख्येने ५ हजारांचा आकडा ओलांडला आहे.

जिल्ह्यातील दोघांचा गेल्या दोन दिवसांत करोनाने मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा १५१ झाला आहे. रत्नागिरीतील ५९ वर्षीय, तर संगमेश्वर येथील ७३ वर्षीय व्यक्तीचा त्यामध्ये समावेश आहे.

मंगळवारी दिवसभरात आणखी ६६ जणांनी करोनावर मात केली. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांतील  करोनामुक्तांची एकूण संख्या संख्या ३ हजार १२६ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७६ करोनाबाधीत

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी आणखी ७६ करोना तपासणी अहवाल बाधीत आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एक हजार ९८५ रुग्ण करोनाबाधित आढळले असून मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ३० झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ९७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात मंगळवारीआणखी ७६ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.