सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने उद्दिष्टाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षाही सक्षमपणे बँकेचे कामकाज सुरू आहे. जिल्हा बँक ग्राहकांसाठी पैसे भरून येणारी यंत्रणा, नेटबँकिंग आणि एटीएम मोबाइल व्हॅन अशा पायाभूत सुविधा मार्चपर्यंत निर्माण करणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक विकास सावंत, संजू परब उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना सतीश सावंत यांनी जिल्हा बँक राष्ट्रीयीकृत बँकापेक्षा एक पाऊल पुढे आहे. शेतकऱ्यांची जिल्हा बँक आहे. त्यामुळे शेतीकर्ज शंभर टक्के वाटप करण्यात आले आहे. शेतीकर्ज लाभार्थ्यांना देणारी ही बँक राज्यात नावारूपाला आली आहे असे सतीश सावंत म्हणाले. पर्यटन प्रकल्पांनाही बँकेने कर्जपुरवठा केला आहे. निवास न्याहारी, स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट अशा तारकर्ली जवळपासच्या आठ प्रकल्पांना कर्ज वाटप केले आहे. एटीएमचा तारकर्ली येथे उत्तम फायदा झाला आहे. ही बँक नेटबँकिंगमध्ये रूपांतरित होईल तसेच सुट्टी दिवशी पैसे भरण्यासाठी खास यंत्रणा जिल्हाभरात बसविली जाईल. जिल्हा बँकेच्या सर्व शाखा ऑनलाइन झाल्याचे सतीश सावंत म्हणाले. शेतकऱ्यांना उसपीक शेतीसाठी कर्जाचे वाटप केले आहे. शेळीपालन व कुक्कुटपालन योजना निर्माण करण्यात येत आहे. येत्या मार्चपर्यंत पैसे भरण्याची सुविधा निर्माण करतानाच मोबाइल व्हॅन एटीएम सेवा दिली जाईल. जत्रौत्सवात किंवा अन्य कार्यक्रमात एटीएम, मोबाइल व्हॅन ग्राहकांना उपयोगी ठरेल. ही सेवा मार्चपर्यंत देण्याचा विचार सतीश सावंत यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेची विमा कंपनीशी चर्चा सुरू आहे. कुटुंबासाठी विमा ग्रुप पद्धतीने उतरवून आरोग्याची सुविधा देण्याचा विचार सुरू आहे. हा विमा उतरविल्यानंतर किमान सहा महिन्यांपासून लाभार्थ्यांना फायदा मिळावा ही अपेक्षा असून, ग्रुप पद्धतीने विमा उतरविण्याची सुविधा राहील असे सतीश सावंत म्हणाले. विमा उतरविताना दहा कॉटचे हॉस्पिटलही लाभार्थी ग्राहकासाठी सेवा देईल अशी तरतूद करण्यात येत आहे. विमा कंपनीशी चर्चा सुरू असून फायनल झाल्यावर तपशीलवार माहिती देण्यात येईल. जिल्हा बँक शेतकरी वर्गाची असल्याने शेतकऱ्यांना अधिक सेवा सुविधा कशा मिळतील त्याचाही विचार केला जात आहे, असे सतीश सावंत म्हणाले. गोकुळचे सध्या पंधरा हजार लिटपर्यंत दूध संकलन सुरू आहे ते २२ हजार लिटपर्यंत लवकरच कसे वाढेल त्याचे नियोजन करण्यात येत आहे. दुधाळ जनावरे, कुक्कुटपालन, शेळीपालनासाठीही लाभार्थी शेतकऱ्यांना योजना आहे, असे सतीश सावंत म्हणाले.