माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाच्या कोट्यातून देण्यात आलेली खासदारकी काढून घ्या, अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली आहे.

‘भाजपाकडून खासदारकी घ्यायची आणि उलट पक्षावरच टीका करायची. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करणाऱ्या नारायण राणेंची हकालपट्टी करा’, अशी मागणी जठार यांनी भाजपाचे प्रभारी सरोजनी पांडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राणेंनी नुकतीच जिल्ह्यात विश्‍वासयात्रा काढली. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

नारायण राणेंनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. तसेच त्यांनी स्वतःचा पक्ष एनडीएमध्ये सामील केला. त्यानंतर भाजपानं आपल्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवलं. सध्या भाजपाच्या कोट्यातून नारायण राणे राज्यसभेवर खासदार आहेत.