कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणात गुरूवारी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) कोल्हापूर सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात डॉ. वीरेंद्र तावडे आणि अन्य जणांवर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वीरेंद्र तावडे याच्या पोलीस कोठडीतही ९ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात समावेश असलेल्या विनय पवारचा कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येतही सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने विनय पवारला ओळखले आहे.  कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्यासाठी विनय पवारने टेहळणी केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीकडून करण्यात आला आहे.
यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पुण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या आरोपपत्रात वीरेंद्र तावडेचा मुख्य आरोपी म्हणून उल्लेख केला होता. डॉ. वीरेंद्र तावडे हाच मुख्य सूत्रधार असून सारंग अकोलकर आणि विनय पवार या साथीदारांच्या मदतीने तावडेने ही हत्या घडविली, असे या आरोपपत्रात म्हटले होते. अकोलकर आणि पवार हे दोघेदेखील ‘सनातन’चेच साधक असून मडगाव बॉम्बस्फोटातही हात असलेला अकोलकर हा फरारी आहे.
येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या तावडेचा कोल्हापूरमधील कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणातही हात असल्याचा संशय कोल्हापूर पोलिसांना होता. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी तावडेचा ताबा गेल्या आठवडय़ात घेतला होता.