वाईतील भोंदू डॉक्टरचे अमानुष कृत्य; शेतघरातच मृतदेह पुरल्याची कबुली
अनैतिक संबंध आणि पैशाच्या मोहातून सातारा जिल्ह्य़ातील वाईनजीक धोम गावात संतोष पोळ या भोंदू डॉक्टरने गेल्या १३ वर्षांत तब्बल सहा खून केल्याचे मंगळवारी उघड झाले. अंगणवाडी सेविका मंगला जेधे हत्याकांडाचा छडा लावताना पोळचे हे अमानुष कृत्य उघड झाले आहे. मंगला जेधेसह आजवर चार अन्य महिलांची हत्या करून त्यांचे मृतदेह आपल्याच शेतघराच्या आवारात त्याने पुरले होते तर एका पुरुषाचा मृतदेह नदीत सोडून दिला होता. कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या पोळने अतिजहाल औषध देऊन हे खून केल्याची कबुली दिली. त्याने पुरलेले पाचही मृतदेह पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
मंगला जेधे या पुण्याला निघाल्या होत्या आणि वाई बसस्थानकातून त्यांचे अपहरण झाले होते. पुण्याला जाण्याआधी त्या पोळ याच्या संपर्कात होत्या, असे तपासात उघड झाल्यानंतर पोळचा शोध पोलिसांनी सुरू केला. फरारी पोळला दादर येथून अटक करण्यात आली. चौकशीत पोळने जेधेसह आणखी पाचजणांची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी पुरलेले मृतदेह बाहेर काढून पुण्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले.

बेबनावानंतर हत्येची पद्धत :
पोलिसांनी जेधे अपहरण प्रकरणात प्रथम पोळसोबत परिचारिका म्हणून काम करणाऱ्या महिलेला अटक झाली. ही परिचारिका आणि जेधे या दोघींशी आपले अनैतिक संबंध होते. त्यातून जेधे या मत्सरग्रस्त होऊन भांडत असत. बेबनाव टोकाला गेला की आपण हत्या करीत असू तेच यावेळी घडले, असे आरोपीने थंडपणे पोलिसांना सांगितल्याचे कळते

पोळचे दुष्कृत्य
सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड, गजाबाई पोळ, सलमा शेख आणि मंगला जेधे या पाच महिलांची आणि नथमल धनाजी भंडारी यांची हत्या
सर्व खून १५ मे २००३ ते जून २०१६ या दरम्यान केले
गायकवाड यांचा मृतदेह कृष्णा नदीत सोडून दिला तर बाकी सर्वाचे मृतदेह हे धोम येथील शेतघरात पुरले.