अलिबाग : श्रीवर्धन शहरातील एका व्यापाऱ्याला मुलीने आपल्या जाळ्यात ओढून तिच्या साथीदारामार्फत ब्लॅकमेल करून पंधरा लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार २४ जून रोजी घडला आहे. याबाबत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेसह सहा जणांना अटक केली आहे, तर अन्य दोन महिला फरार आहेत. हे प्रकरण खंडणीचे असले तरी यामध्ये सेक्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या खंडणी प्रकरणात भूषण पतंगे (२९), विशाल मोरे (३३), कुणाल बंदरी (२८), अलका ठाकूर (६५), सिद्धार्थ मोरे (२७), सर्व राहणार अलिबाग, जगदीश ठाकूर (४२) रा. बोर्ली मांडला, अक्षय दासगवकर (२५), रा माणगाव या सात आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी पूजा व अनोळखी महिला फरार आहे.

श्रीवर्धन शहरातील एका किराणा व्यापाराला २४ जून रोजी आरोपी पूजा हिने फोन करून तिच्या वडिलांच्या आजारपणाकरिता पशांची गरज असून फिर्यादी यांनी पैसे दिल्यास माझ्यासोबत हवे असेल तसे करू शकता असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी हे पूजाच्या बोलण्यावर भुलून माणगांव येथे गेले. त्यानंतर फिर्यादी पूजा हिला घेऊन माणगावमधील पूजा लॉजवर घेऊन गेले. लॉजवरील रूमवर पोहचल्यावर आरोपी विशाल मोरे व भूषण पतंगे हे लॉजच्या रूमवर येऊन धडकले. विशाल मोरे याने मी पूजा हिचा भाऊ आहे तर भूषण याने मी पत्रकार आहे असे सांगून इतर आरोपींनी फिर्यादी यास मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जगदीश ठाकूर यांच्या झायलो कारमध्ये फिर्यादी याला टाकून अपहरण केले. त्यानंतर फिर्यादी याची सुटका करण्यासाठी १५ लाखांच्या खंडणीची मागणी केली.

माणगाव येथे पशांची व्यवस्था न झाल्यामुळे त्या व्यापाऱ्यासह खंडणी मागणारे सगळे श्रीवर्धन येथे आले. श्रीवर्धन येथे आल्यानंतर सदर खंडणीखोर तडजोडीसाठी बसले. यावेळी तडजोडीला बसणाऱ्यांना समोरच्या व्यक्तींचा संशय आल्यामुळे त्यांना घेऊन ते श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर सर्वजण पोपटासारखे बोलायला लागले.

याबाबत फिर्यादी यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीवर्धन पोलिसांनी खंडणीबाबत गुन्हा दाखल केला असून सात आरोपींना अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी व एक महिला फरार आहे.

श्रीवर्धनमधील या व्यापाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढून लुटण्याचा प्रकार घडला असताना अजून काही व्यापाऱ्यांना लुटले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलीस तपासामध्ये खरी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.