पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय वायुसेने घेतल्याचे वृत्त समोर येताच सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया येत आहे. जैशच्या सैतानाला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही असे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी लष्करी कारवाई करत भारताने पाकिस्तानमधील बालाकोट भागात थेट हल्ला केला असून या हवाई हल्ल्याद्वारे तेथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.

भारतीय वायूसेने आज केलेल्या अभिमानास्पद कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही वायूसेनेच्या या कामगिरीचे ट्टिट करत अभिनंदन केले आहे. हिंदुस्तानच्या फायटर विमानांनी पाकव्याप्त काशमीरवर हल्ला केला. वायू सेनेचे अभिनंदन. जैश ए मोहम्मदचा सैतान अजहर मसुदला मारल्या शिवाय बदला पुर्ण होणार नाही. असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांच्याशिवाय धनजंय मुंडे यांनीही ट्विट करत वायूसेनेचे अभिनंदन केले आहे.


‘पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावार भारतीय वायुसैनेने हल्ला केला आहे. भारताने कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा तोडलेला नाही, स्वरक्षणासाठी हा हल्ला केल्याची प्रतिक्रिया सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली आहे.’  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना सलाम केला आहे.

(आणखी वाचा : ‘भारताचे हजार तुकडे करू म्हणणाऱ्यावर १००० किलो बॉम्बचा वर्षाव’ )

तत्पूर्वी, भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलो बॉम्ब फेकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते.

या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओके घुसल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांनी मोठ्या नुकसानीचे वृत्त फेटाळले आहे.