दहा महिन्यांत सर्पदंशाने नऊ जणांचा तर विंचूदंशाने एकाचा मृत्यू

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यत गेल्या दहा महिन्यांत सर्पदंशामुळे नऊ तर विंचूदंशामुळे एक जण दगावला आहे. गेल्या तीन वर्षांत सतरा जण सर्पदंशामुळे दगावले आहेत तर विंचूदंशामुळे तिघे दगावले आहेत. जिल्ह्यत सर्पदंशाचे प्रमाण लक्षणीय असून सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर प्रथमोपचार व लवकरात लवकर उपचार मिळणे आवश्यक असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

पालघर जिल्ह्यतील ग्रामीणबहुल भागात सर्पदंश, विंचूदंश याचे प्रमाण मोठे आहे. शेतामध्ये, घराच्या आडोशाला, रस्त्यात काळोखात चालताना पाय पडल्याने हे दंश होत आहेत. सर्पदंशामुळे १७ जणांचा मृत्यू झाल्याच्या नोंदी असून गेल्या तीन वर्षांत अडीच हजारहून अधिक नागरिकांना सर्पदंश झाल्याचे दिसून येते. यंदाच्या वर्षी २२३ जणांना विंचूदंश झाला असून गेल्या वर्षी ४५२ तर २०१८-१९ मध्ये ३९३ जणांना विंचूदंश झाला होता.

गेल्या वर्षी सर्वाधिक सर्पदंशाचे मृत्यू कासा रुग्णालयात व जव्हार रुग्णालयात झाले असून कासा रुग्णालयात चार जणांचा, जव्हार रुग्णालयात तीन जणांचा तर मनोर रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यत गेल्या दोन वर्षांत प्रत्येकी चार मृत्यू झाले असले तरी त्या तुलनेत या वर्षी मृत्यू झाल्याचा आकडा वाढला आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंत नऊ जण दगावले आहेत. सर्पदंश झालेल्या रुग्णांची संख्या रुग्णालयनिहाय वेगवेगळी असल्याची दिसून येते.

सर्प, विंचूदंश झाल्यानंतर दंश झालेल्या व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जाते. तेथे प्राथमिक उपचार किंवा विषविरोधी लस देऊन पुढे आवश्यकता भासल्यास उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात येते. काही वेळेला सर्पदंश झाल्यानंतर त्या व्यक्तीवर तातडीने उपचार करणे शक्य झाले नाही तर उपचारांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊन जीव धोक्यात येतो. सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांमध्ये तरुणांचा समावेश मोठा असल्याची माहिती पुढे आली आहे.

सर्पदंश झालेल्या रुग्णाला स्थानीय पातळीवर प्रथोपचार मिळून वाहन व्यवस्था झाल्यास उपचारासाठी तातडीने पाठविणे आवश्यक असते. त्या दृष्टीने जिल्ह्यत व्यवस्था उभारणे आवश्यक आहे.

‘पॉलीवेनम’ लसीचा आधार

जिल्ह्यात हरणटोळ, धामण असे बिनविषारी सर्प आढळत असून अशा सर्पदंशामध्ये रुग्णावर २४ तास देखरेख ठेवण्यात येते. फुरसा व घोणस हे रक्तावर आघात करणारे तर कोब्रा व मण्यार हे मज्जासंस्थेवर आघात करणारे सर्प जिल्ह्यत प्रामुख्याने आढळतात. अशा कोणत्याही विषारी सर्पानी दंश केल्यास रुग्णाला ‘पॉलीवेनम’ लस दिली जाते. कोकणातील सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा जिल्ह्याचा सर्प मुत्युदर कमी आहे.