विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत साप आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे, नांदेडच्या हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी हा धक्कादायक प्रकार घडला. शाळेच्या अशा गलथान कारभारावर पालकांकडून तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच नांदेडच्या शिक्षण विभागाचे पथक शाळेत दाखल झाले असून चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी दुपारी मध्यान्ह भोजन म्हणून खिचडी देण्यात आली होती. सुदैवाने खिचडी खाण्याआधी शिक्षकांच्या तपासणीत एका विद्यार्थ्याच्या ताटात मृतावस्थेतील साप आढळला. त्यानंतर विद्यार्थ्यांना खिचडी खाऊ न देता त्या खिचडीची विल्हेवाट लावण्यात आली. कुणीही खिचडी न खाल्याने कुणाच्याही आरोग्याला धोका नसल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.