पैसे दामदुप्पट करून देतो, असाध्य आजार बरा करतो असे दावे करत नाशिक व नगर जिल्ह्य़ांतील भक्तांची फसवणूक करणारा हरिओम बाबा उर्फ दिलिप जमनाप्रसाद तिवारी नवविवाहितेला घेऊन पसार झाला आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भोंदूबाबाला पोलिसांनी त्वरित अटक करावी आणि यापूर्वी ज्या व्यक्तींची या बाबाने फसवणूक केली आहे, त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केले आहे.
देवळा तालुक्यातील वरवंडी येथे आश्रम थाटून भक्तांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबाविरुध्द बुलढाणा जिल्ह्य़ातील सिंदखेडराजा येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे, तर अमरावती जिल्ह्य़ातील सावरखेडा येथेही याच स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. तेथून गायब झालेल्या भोंदूबाबाने भक्तांना लुबाडून कोटय़वधीची मालमत्ता जमविली. या भोंदूबाबाने आपल्या पत्नीला पळवून नेल्याची तक्रार कोपरगाव येथील एकाने केली आहे. ही व्यक्ती भोंदूबाबाच्या आश्रमात काम करत असताना बाबाने त्याचे वैदीक पध्दतीने लग्न लावून दिले. नंतर नवविवाहितेला फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बाबाने १८ लाख रूपयांना आपली फसवणूक केल्याची तक्रार सिन्नर येथील कल्पना पगार यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिली आहे. आपल्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून भोंदूबाबाने जेसीबी यंत्र घेण्यासाठी वेळोवेळी पैसे घेतले.
या रकमेतून त्याने स्वत:च्या वडिलांच्या नावे जेसीबी खरेदी केला. पैसे परत करू म्हणून लिहून दिले. परंतु, पैसे परत न करता भोंदूबाबाने विश्वासघात केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी हरिओम बाबाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे दुप्पट करून देण्यासाठी बाबाने नाशिकसह नगर जिल्ह्य़ातील काही दलालांची नेमणूक केल्याचे सांगितले जाते. या दोन्ही जिल्ह्य़ांतील अनेकांना त्याने गंडविले. पैसे दुप्पट करून देण्यासाठी किमान दहा लाख रूपयांहून अधिकची रक्कम तो स्वीकारत असे. या प्रकरणी बाबाविरुध्द भक्तांनी तक्रारी करू नये म्हणून स्थानिक पातळीवरील काही राजकीय व्यक्तींनी दबाव आणल्याचे सांगितले जाते.