अलिबाग तालुक्यांतील नागाव येथील बुरूड आळी मधील चार कुटुंबांना वाळीत टाकण्याच्या प्रकरणामध्ये तक्रारदार विष्णु काशिनाथ रुईकर, प्रवीण काशिनाथ रुईकर, मिथुन दत्तात्रेय तेलंगे, प्रशांत गंगाराम खैरे यांच्या कुटुंबातील स्त्रियांना गावकीच्या गटातील स्त्रियांनी वाळीत प्रकरण पोलिसांत नेल्याबद्दल धमकाविल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

तक्रारदार प्रशांत गंगाराम खैरे यांच्या पत्नी प्रतीक्षा प्रशांत खैरे यांना गावकीच्या गटातील रवींद्र हरिश्चंद्र नागे याने तुमच्या नवऱ्याने आमच्या विरुद्ध वाळीत टाकल्याची तक्रार पोलिसांत केली आहे, तुम्हा सर्वाना बघून घेऊ, अशी उघड धमकी दिल्याचे खैरे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे. अलिबाग पोलिसांना या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तीन दिवसांपूर्वी तक्रारदारांनी अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा तक्रार अर्ज दाखल करून नागाव बुरूड आळी येथील बुरूड समाज मंडळी कमिटीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांत तक्रार दाखल होऊनही गावकीच्या मंडळींना कसलीही भीती वाटत नसून उलट तक्रार दाखल केल्याबद्दल आम्हाला वारंवार हिणवले जात असल्याचे मिथुन तेलंगे यांनी सांगितले. बहिष्कार टाकणाऱ्यांना त्वरित अटक करा, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला कडक शब्दांत सुनावले असूनही पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मिथुन तेलंगे यांनी केली आहे.