मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर रायगड जिल्हा परिषदेतील तत्कालीन समाजकल्याण अधिकारी संदीप यादव यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाने आयुक्तांना दिले आहेत. सामाजिक कार्यकत्रे संजय सावंत यांच्या तक्रारीनंतर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण आणि महिला बालकल्याण विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य राजीव साबळे यांनी केला होता. रायगड जिल्हा परिषदेमधील महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडीकरिता सन २०१४-१५मध्ये ज्ञानदíशका व पूर्वशालेय संच व शैक्षणिक तक्ते यांचे एकूण बील ९७ लाख रुपये, एसव्हीआर एकूण बील ९० लाख रुपये, खेळणी संच ९० लाख रुपये अशी एकूण दोन कोटी ७७ लाख रुपयांची साहित्यखरेदी नियमबाहय़रीतीने करण्यात आल्याची जिल्हा परिषद सदस्यांची तक्रार होती. याच विभागाने ३१ लाख ७७ हजार ४०५ रुपयांची झेरॉक्स मशीन खरेदी करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट सह्य़ा करून या खरेदी केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही तात्कालीन समाजकल्याण अधिकारी संदीप यादव यांनी पोलीस तक्रार केली नाही. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकत्रे संजय सावंत यांनी केली होती.  सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या तक्रारीनंतर तात्कालीन समाजकल्याण अधिकारी संदीप यादव यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश समाजकल्याण विभागाने आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.