गरिमा रियल इस्टेट अ‍ॅन्ड अलाईड प्रा. लि. कंपनीची शाखा सोलापुरात सुरू करून आकर्षक योजनांचे आमिष दाखवून ठेवीदारांकडून आठ कोटींपेक्षा जास्त ठेवी जमा केल्या आणि ठेवींचे परतावे न देता सर्वांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर कंपनीच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. त्याला सोलापूरच्या विशेष न्यायालयाने ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक झालेला कंपनीचा अध्यक्ष बनवारीलाल कुशवाह (वय ३८) हा मध्य प्रदेशातील बसपाचा माजी आमदार आहे. त्याचे अन्य साथीदार अद्याप फरार आहेत.

बनवारीलाल  कुशवाह हा मध्य प्रदेशातील धोलपूर जिल्ह्यात जमालपूर येथील राहणारा आहे. ग्वाल्हेर येथील गरिमा रियल इस्टेट अ‍ॅन्ड अलाईड प्रा. लि. कंपनी व पंजाबात मोहाली येथे स्थापित गरिमा होम्स अ‍ॅन्ड फॉर्म हाऊसेस प्रा. लि. कंपनीचा तो अध्यक्ष आहे. त्याने कंपनीच्या शाखा महाराष्ट्रात सोलापूरसह अन्य काही ठिकाणी थाटल्या होत्या. २०११ साली सोलापुरात नव्यापेठेत ढंगे कॉम्प्लेक्समध्ये कंपनीच्या शाखेचे कार्यालय सुरू झाले होते. २०११ ते १८ एप्रिल २०१९ या कालावधीत कंपनीने विविध आकर्षक गुंतवणूक योजना सुरू करून गुंतवणूकदारांना भुरळ पाडली होती. त्यातून अनेक मध्यमवर्गीय मंडळींनी ठेवींच्या रूपाने कंपनीत गुंतवणूक केली होती. नंतर एके दिवशी अचानकपणे कंपनीच्या शाखेचे कार्यालय बंद झाले. ठेवीदारांनी गुंतविलेल्या ठेवींचे परतावे मिळालेच नाहीत. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे दिसून येताच शेवटी ठेवीदारांपैकी प्रकाश चंद्रशेखर डमामी (वय ४१, रा. रामराज्य नगर, शेळगी, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. त्यानुसार कंपनीचा अध्यक्ष तथा माजी आमदार बनवारीलाल कुशवाह याच्यासह संचालक असलेले त्याचे बंधू शिवराम माधवसिंह कुशवाह, पत्नी शोभाराणी कुशवाह, कन्हैयालाल नथीलाल कुशवाह, बेनीसिंह नथीलाल कुशवाह (सर्व रा. धोलपूर, मध्य प्रदेश), राजेंद्र पुराण राजपूत (चिरोरा, जि. धोलपूर) व रोहित फकीरचंद बनेत (रा. कुरूक्षेत्र, हरियाणा) या सर्व संचालकांविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गरिमा कंपनीने  महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही ठिकठिकाणी हजारो ठेवीदारांना कोटय़वधींचा गंडा घातल्याची बाब उजेडात आली.