मोची समाजा पाठोपाठ मुस्लीम समाजाचाही मतदारसंघावर दावा

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हेदेखील सलग दुसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर पक्षाची अवस्था अतिशय केविलवाणी झाली. त्यात, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षाचे दोन आमदार भाजप-शिवसेना युतीत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत असताना इकडे शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातच आता स्वपक्षातून आव्हान निर्माण होत आहे. शहरातील मोची समाजापाठोपाठ मुस्लीम समाजाच्याही काँग्रेसच्या मंडळींनी शहर मध्य मतदारसंघावर दावा सांगितला असून यामुळे त्यांच्या उमेदवारीत आताच अडथळे उभे राहू लागले आहेत.

स्थानिक मुस्लीम व मोची समाज पररंपरेने काँग्रेसच्या पाठीशी राहात आला आहे. परंतु या दोन्ही समाजातील काँग्रेसच्या मंडळींनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पक्षाने संधी देण्यासाठी बैठकांचे सत्र आरंभले आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघातून दोनवेळा प्रतिनिधित्व केले असून आता तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून विधानसभा लढविण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. परंतु त्यांनी आता ही जागा सोडून मोहोळ राखीव मतदारसंघातून उभे राहावे, असा आग्रह करीत शहर मध्य मतदारसंघावर मोची समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी या समाजाच्या बैठकीत करण्यात आली. पक्षाचे महापालिकेतील माजी सभागृहनेते देवेंद्र भंडारे व माजी महापौर संजय हेमगड्डी यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता. जर मोची समाजाला न्याय न मिळाल्यास पक्षाला साथ द्यायची की नाही, याचा विचार करू, असा इशाराही या बैठकीत दिला गेल्याने काँग्रेसच्या वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे.

एकीकडे मोची समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यास विरोध चालविला असताना दुसरीकडे मुस्लीम समाजातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनीही आमदार प्रणिती शिंदे यांच्याऐवजी मुस्लीम समाजालाच संधी देण्याची मागणी केली आहे. माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांनी यासंदर्भात रविवारी एका पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य मतदारसंघातून दोनवेळा प्रतिनिधित्व केल्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यांना दुसऱ्या मतदारसंघातून संधी द्यावी. त्यासाठी मोहोळ राखीव मतदारसंघ सुरक्षित आहे.

शहर मध्य मतदारसंघात एकूण साडेतीन लाख मतदारांपैकी सुमारे सव्वा लाख मुस्लीम मतदार आहेत. आतार्पयंत मुस्लीम समाजाने काँग्रेसला साथ दिली असताना पक्षाने या समाजाला निवडणुकीत उमेदवारी देताना डावलले आहे. हा अन्याय दूर व्हावा, अशी बहुसंख्य मुस्लीम कार्यकर्त्यांची धारणा आहे. आता पुन्हा संधी डावलली गेल्यास असंतोष वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. यासंदर्भात नवी दिल्ली येथील पक्षश्रेष्ठींना निवेदने पाठविण्यात आल्याचे अ‍ॅड. बेरिया यांनी सांगितले.

प्रणिती शिंदे यांचा निर्धार कायम

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर मोची आणि मुस्लीम समाजाच्या मंडळींनी दावा केला असला तरी या जागेवर आपणच प्रबळ दावेदार असून ही जागा आपणच लढविणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले. आपण गेली दहा वर्षे याच मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत आहोत. मतदारसंघाच्या विकासकामांच्या माध्यमांतून मतदारांशी थेट संबंध राहिला आहे. कामांची पोचपावती मिळण्यासाठी याच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याचा आपला निर्धार कायम असल्याचे त्यांनी सांगितले. मोची आणि मुस्लीम समाजाच्या संबंधित प्रमुख नेते मंडळींसह इतर सर्वाशी आपली चर्चा झाली असून त्या सर्वानी आपणांस समर्थन देण्याचे मान्य केल्याचा दावाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.