सोलापूर जिल्ह्यात यंदा जून व जुलै महिन्यात मागील दहा वर्षात प्रथमच तब्बल ३११ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. चांगल्या पाऊसमानामुळे संपुर्ण जिल्हा टँकरमुक्त झाला असून दुसरीकडे आता खरीप पिकांसाठीही सोलापूरची ओळख निर्माण झाली आहे.

पूर्वापार परंपरेने सोलापूर हा रब्बी पिकांच्या हंगामासाठी ओळखला जातो. कारण येथे खरीप हंगामात पुरेसा पाऊस नसतो. जून व जुलैमध्ये जेमतेम पाऊस होतो. ऑगस्ट व सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये पावसाची शाश्वती असते. त्यामुळे रब्बी हंगामात पिकांच्या पेरण्या होतात. परंतु अलिकडे काही वर्षे जून व जुलैमध्ये पाऊस पडत असल्यामुळे खरीप हंगामात पिकांच्या पेरण्या होत आहेत. सुरूवातीला सुमारे एक लाख हेक्टर एवढ्याच मर्यादित क्षेत्रात खरीपाच्या पेरण्या व्हायच्या. अलिकडे त्यात वाढ होऊन सध्या दोन लाख ३४ हजार हेक्टर खरीप पिकांच्या पेरण्यांसाठीचे सरासरी क्षेत्र होते. त्यात यंदा आणखी सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्राची वाढ होऊन तीन लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्या आहेत. यात बाजरी, मका, तूर, मूग, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस आदी पिकांच्या पेरण्या वाढल्या आहेत. ही पिके सध्या चांगल्या स्थितीत असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

यंदा जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी १६२ मिमी तर जुलैपर्यंत ३११.४ मिमी पाऊस झाला आहे. सरासरी पावसाच्या १६०.४ टक्के इतका समाधानकारक पाऊस झाला आहे. यापूर्वी असा पाऊस दहा वर्षापूर्वी म्हणजे २०१० साली झाला होता. २०१५ साली या कालावधीत खूपच कमी म्हणजे अवघा ६५ मिमी इतकाच पाऊस पडला होता. यंदा चांगल्या पावसामुळे शेतीचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण दिसून येते.

चांगल्या आणि सातत्यपूर्ण पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्नही निकालात निघाला आहे. यापूर्वी जिल्ह्यात ३४३ गावांची तहान भागविण्यासाठी ३९८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. गतवर्षी १८ गावांना १५ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. परंतु यंदा चांगल्या पाऊसमानामुळे एकाही गावात पाणीटंचाई निर्माण झाली नाही. परिणामी पाणी पुरवठ्यासाठी एकही टँकर सुरू करण्याची वेळ आली नसल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.