सोलापूर : गेल्या मार्चमध्ये वाढलेल्या तापमानाचा पारा आता चांगलेच डोके वर काढू लागला आहे. यंदाच्या एप्रिलमध्ये पहिल्या आठवडय़ात वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे तापमानात किंचित घट झाली होती. परंतु त्यानंतर तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागल्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत. गुरुवारी  उच्चांकी ४३ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदले गेले.

गेल्या आठवडय़ात तापमान ४२.८ अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते. त्यात आणखी भर पडून तापमनाचा पारा  ४३ अंशांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त होत होती. परंतु वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा तापमान वाढू लागले असून आता तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचल्यामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्म्याचा त्रास असह्य़ होऊ लागला आहे. सकाळी दहापासून उन्हाच्या झळा जाणवत आहेत. सायंकाळी पाचनंतर उन्हाची तीव्रता कमी होताच, नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी घरातून बाहेर पडणे पसंत करतात. दुपारच्या रणरणत्या उन्हात रस्त्यावरील वाहतूक रोडावल्याचे चित्र पाहावयास मिळते.

वाढत्या उन्हात घराबाहेर पडताना उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून नागरिक डोक्यावर टोपी किंवा पांढरा गमजा घालणे पसंत करतात. त्यामुळे बाजारात टोप्या आणि पांढऱ्या रंगाच्या गमजा खरेदीसाठी गर्दी होत आहे. उन्हाळा सुसह्य़ करण्यासाठी नागरिक सायंकाळी घराबाहेर पडून उद्यानात फेरफटका मारताना दिसतात. तसेच शीतपेयांचाही आधार घेतला जात आहे. घरात उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी विद्युत कूलरचा वापर करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.