चंद्रपुरातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ; तीनही आरोपी फरार

लग्नाचे आमिष दाखवून सलग दीड वर्षे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा सौमय्या पॉलिटेक्निकचे संचालक पीयूष पांडुरंग आंबटकर यांच्याविरुद्ध बलात्काराचा तर संस्थाध्यक्ष पांडुरंग आंबटकर व त्यांचे जावई अमोल रघाताटे यांच्या विरुद्ध जबरदस्तीने गर्भपात केल्याचा गुन्हा नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आंबटकर यांच्या विरुद्ध जिल्हय़ातील बहुतांश पोलीस ठाण्यात फसवणुकीसोबतच इतरही गुन्हे
दाखल आहेत. दरम्यान, पीडित मुलीने मनसे महिला सेनेच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडली आहे.

चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये मनसे महिला सेनेच्या सुनीता गायकवाड, प्रतिमा ठाकूर व मेश्राम यांनी पीडित मुलीसह या बलात्कार, गर्भपाताची संपूर्ण घटना पत्रकारांसमक्ष मांडली. पीडित मुलगी ही नागपूरची रहिवासी असून ती कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. तिची व पीयूष आंबटकर यांची ओळख दीड वर्षांआधी झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यावेळेस पीयूषने लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, तिला दिवस गेले. याची माहिती पीयूषला दिली असताना त्याने हात झटकले व गर्भपात करून लग्नास स्पष्ट नकार दिला. पीयूषचे वडील पांडुरंग आंबटकर यांनी जीवे मारण्याची धमकी देत हे संपूर्ण प्रकरण संपवण्यास सांगितले. आम्ही मुलाचे
लग्न करणार नाही असेही सांगितले. वारंवार लग्नाची विनंती केल्यानंतरही नकार मिळाला. दरम्यान, गर्भ चार महिन्याचा झाला. त्यानंतर एके दिवशी पीयूषचे वडील व त्यांचे जावई अमोल रघाताटे, किशन पवार घरी आले व विम्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे पांडुरंग आंबटकर यांनी डॉक्टरांशी संगनमत करत शरीरात हिमोग्लोबीन कमी आहे, तपासणी करायची आहे असे सांगून न सांगताच गर्भपात केला. तेव्हापासून ही सर्व मंडळी संपर्क टाळत आहेत. दरम्यान, यानंतरही आंबटकर यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु काही केल्या ते भेटत नव्हते. शेवटी १९ ऑक्टोबर रोजी नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर सौमय्या पॉलिटेक्निकचे संचालक पीयूष आंबटकर यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संस्थाध्यक्ष व आरोपीचे वडील पांडुरंग आंबटकर व अमोल रघाताटे यांच्या विरुद्ध जबरदस्तीने गर्भपात केल्याचा व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.