शिवसेनेतील अनेक खासदार शिवसेना सोडत असून, तो पक्ष कमकुवत होत चालला आहे. काही खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी जुन्नर येथील मेळाव्यात केला.
शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी परिसर विकास समिती व शिवप्रेमी जुन्नर तालुका यांच्या वतीने शिवजयंती निमित्त जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात आयोजित केलेल्या शिवप्रेमींच्या जाहीर मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. शिवजयंती निमित्त शिवसृष्टी व जुन्नर प्रवेशद्वाराचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार वल्लभ बेनके, आमदार दिलीप मोहिते, बापूसाहेब पठारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, जि.प.उपाध्यक्ष प्रदीप कंद, नगराध्यक्ष दिनेश दुबे, युवा नेते अतुल बेनके, ज्योत्स्ना झोडगे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, आय.पी.एस.अधिकारी व जुन्नर भूषण पुरस्कारचे मानकरी आशुतोष डुंबरे, विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, शिवसेनेची वाईट अवस्था होत चालली आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडूण आलेले मराठवाडा व उत्तर भागातील खासदार हे पक्ष सोडून अन्य पक्षाकडे जात आहेत. काही खासदार राष्ट्रवादी पक्षाशी संपर्क साधत असून लवकरच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल. राज्याचा अर्थसंकल्प जूनमध्ये सादर करण्यात येणार असून त्यात किल्ले शिवनेरी परिसर विकासासाठी २० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.