ख्यातनाम कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी आहेत, ‘इतकेच मला सरणावर जाताना कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.’ या ओळी आठवण्याचे कारण आहे जगण्यातला छळ सांगणारी घटना. एका मुलाने त्याच्या आईला जिवंतपणीच स्मशानात आणून ठेवले आहे. स्मशान ही अशी जागा आहे जिथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. तिथे दररोज मृतदेह आणले जातात, मात्र या मुलाने जिवंतपणीच आपल्या आईचा स्मशानात जगण्याचा छळ मांडला आहे. बायकोशी आईचे पटत नाही म्हणून हा निर्णय त्याने घेतल्याचे समजते आहे. अहमदनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

‘एबीपी माझा’ने दिलेल्या बातमीनुसार मागील काही आठवड्यांपासून लक्ष्मीबाई आहुजा यांना त्यांच्या मुलाने स्मशानभूमीत आणून ठेवले आहे. ‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही घटना समोर आली आहे.ज्या मुलाला वाढवले, त्याच्या पायावर उभे केले त्याच मुलाने लक्ष्मीबाईंना जिवंतपणी स्मशानात आणून ठेवले. इतके सगळे होऊनही मुलगा वाईट नाही पण सुनेशी पटत नाही म्हणून त्याने मला इथे ठेवले आहे असे लक्ष्मीबाई म्हणतात. त्यांच्या या प्रतिक्रियेवरूनच आईचे काळीज किती क्षमाशील असते याची कल्पना येते. त्यांचा मुलगा त्यांना रोज जेवणाचा डबा आणून देतो, मात्र घरी न्यायचे नावही घेत नाही. मुलगा आपल्याला घरी कधी घेऊन जाणार?, याची लक्ष्मीबाई वाट बघत आहेत.

माऊली नावाच्या सामाजिक संस्थेने स्मशानात वास्तव्य करणाऱ्या लक्ष्मीबाईंची निवाऱ्याची व्यवस्था केली आहे अशीही माहिती समोर आली आहे.सध्याच्या प्रचंड प्रगतीच्या वेगात माणूस माणुसकी हरवत चालला आहे. नवरा बायको, बहिण-भाऊ या नात्यांमध्ये आलेला कमालीचा कोरडेपणा आता आई मुलाच्या नात्यातही येऊ लागला असल्याचेच हे उदाहरण आहे. ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणे, स्मशानात ठेवणे कितपत योग्य आहे? याचा मुलाने अंतर्मुख होऊन विचार  करायला हवा.

पत्रकार शलाका मुंगी-धर्माधिकारी  यांनी या संदर्भातली फेसबुक पोस्टही व्हायरल केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लक्ष्मीबाई आहुजा या गेले काही महिने इथे वास्तव्य करत असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर अमरधाम स्मशानभूमीची अवस्था काय आहे हेदेखील सांगितले आहे.