येथील नगरसेवक आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष योगेश गढिया यांच्या सोळा वर्षीय मुलाची अश्लील सीडी बनवून ती माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून २० लाख रुपये खंडणी वसूल केल्याचे खळबळजनक प्रकरण सध्या शहरात जोरदार गाजत आहे.
याप्रकरणी खुद्द योगेश गढिया यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आरोपी सुमित सिसोदिया याच्याविरुद्ध खंडणी वसूल करणे, बाल लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी देणे, अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगणे इत्यादी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची आम्ही गांभीर्याने चौकशी करत असून या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा शोध घेत असल्याचे वडगाव रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव यांनी सांगितले.
गढिया यांच्या मुलाकडून आरोपीने प्रत्येक वेळी दोन-तीन लाख रुपये, असे तीन-चार वेळा पैसे वसूल केले. घरातून पैसे गायब कसे होतात, याची चौकशी केली तेव्हा सारा प्रकार योगेश गढिया यांच्या लक्षात आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. माजी नगराध्यक्षांच्या सोळा वर्षांच्या मुलाला अशा प्रकरणात अडकवून त्याची सीडी काढणे आणि नंतर धमक्या देऊन लाखो रुपये खंडणी वसूल करणे, अशी घटना यवतमाळात पहिल्यांदाच घडल्याने शहरात खळबळ उडाली असून सध्या सार्वत्रिक चर्चेचा विषय आहे. मुख्य आरोपी सुमित सिसोदिया फरार असून त्याचा पोलीस शोध घेत असल्याचे ठाणेदार जाधव यांनी सांगितले.