ज्वारीचा दर पन्नाशीपार तर कांद्याबरोबर मिरची, लसणाचे भावही गगनाला

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

सांगलीच्या बाजारात शाळू ज्वारीचा दर पन्नाशीवर आणि मिरचीबरोबरच लसूण, कांदा यांचे दर आवाक्याबाहेर गेल्याने गरिबाची चटणी-भाकर महागली आहे. शाळू ज्वारी बाजारात येण्यास अद्याप अवधी असल्याने आणखी दोन महिने दर चढेच राहतील असा व्यापारी वर्गाचा होरा असून आंध्रातून मिरचीची आवकही घटली आहे.

गरिबाच्या रोजच्या जेवणात अत्यावश्यक असलेली ज्वारीची भाकर आता दुर्मीळ होत असून ज्वारीच्या भाकरीऐवजी गव्हाचा वापर वाढला आहे. शाळूचा हंगाम सुरू होण्यास अद्याप दोन महिन्यांचा अवधी असल्याने सांगलीच्या बाजारात आवकही  रोडावली असल्याचे बाजार समितीच्या दैनंदिन आवकेवरून स्पष्ट होते. सांगलीच्या ठोक बाजारात शाळू ज्वारीचा दर ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांवर गेला असून किरकोळ बाजारात याच शाळू ज्वारीचा दर किलोला ५० रुपयांवर गेला आहे. नंद्याळ ज्वारीचा दरही यंदा ३ हजार ५०० ते ३ हजार ६०० रुपयांवर ठोक बाजारात पोहचला असल्याने किरकोळ बाजारात या ज्वारीचा दर ४० रुपये किलोवर पोहचला आहे.

बाजारात मिरचीची आवकही घटली असून ऑक्टोबरअखेपर्यंत परतीचा मान्सून कायम राहिल्याने वाळलेल्या मिरचीची आवकही कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने मिरचीचे दर दुपटीने वाढले आहेत. बाजारात मिरचीचे किलोचे दर असे आहेत देशी, तेजा- १९० ते २१० रुपये, गुंटूर- २०० ते २१० रुपये, ब्यॅडगी- २१० ते २२० आणि संकेश्वरी- २०० ते २१० रुपये.

देशी लसणाच्या दरात वाढ

चटणी करण्यासाठी मिरचीसोबतच कांद्याची गरजही असते. तिखट करण्यासाठी लागणाऱ्या कांदा व लसणाचेही दर वाढले आहेत. याचबरोबर कांदा बाजारातही आवक कमी असल्याने चांगल्या कांद्याचा दर किलोला शंभर रुपयांवर गेला आहे. तर देशी लसणाचा दर २२० ते २५० रुपये किलोवर गेला आहे. चटणी करण्यासाठी गंध आणि चव देणाऱ्या देशी लसणाचा प्रामुख्याने वापर केला जात असल्याने बाजारात देशी लसूणच गायब झाला आहे. सध्या बाजारात संकरित लसूण उपलब्ध असला तरी त्याचा वापर महिला वर्गाकडून कटाक्षाने टाळला जातो. चटणीसाठी लागणारे अन्य मसाल्याचे पदार्थ आवाक्यात असले तरी मुख्य मिरची, कांदा, लसूण महागल्याने भाकरीबरोबरच चटणीही महागली आहे.