धवल कुलकर्णी 

त्या शिवसेनेच्या नेत्याच्या आवाजात कमालीची धाकधूक होती शिवसेनेने भाजपाची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी करण्याचा निर्णय जरी घेतला असला, तरीही सरकार स्थापन झाल्याशिवाय काही खरे नाही असे पक्षाच्या अनेक नेत्यांना वाटते. त्याचे कारणही तसेच आहे.

एकतर जनतेने महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत दिलेला कौल हा संमिश्र आहे. भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापन करायची असली तर  शिवसेनेशिवाय आणि शिवसेनेला भाजपाशी काडीमोड घेऊन सत्तेवर यायचं असलं तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय काहीही पर्याय नाही.

पण इथेच तर मेख आहे…

शिवसेनेचे अनेक नेते खासगीत बोलताना हे मान्य करतात ही पक्षाने शत्रूवर अवलंबून रहात एवढी मोठी उडी मारून एक मोठी रिस्क घेतली आहे. “अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावरून भाजपाने आम्हाला खोटे ठरवले, म्हणून आम्हाला आमच्या शत्रूकडे म्हणजेच काँग्रेस व राष्ट्रवादीकडे नाईलाजाने जावे लागले. पण, आम्ही या पक्षावरती खास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. त्याची कारणंही तशीच आहेत. २०१४ मध्ये जेव्हा कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते, पण भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला स्थिर सरकारच्या नावाने पाठिंबा देऊन आमची ‘बार्गेनिंग पॉवर’ एका झटक्यात कमी करून ठेवली होती. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे संबंध सर्व पक्षातील नेत्यांशी आहेत हे मान्य करावेच लागेल,” असं शिवसेनेचे नेते खासगीत सांगतात.

आणखी एका शिवसेना नेत्याने एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. त्याने त्याने हे लक्षात आणून दिले की जरी शिवसेनेच्या एकमेव मंत्र्याने म्हणजे अरविंद सावंत यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला असला तरीसुद्धा शिवसेनेने अद्याप तरी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्याच्या मते ही गोष्ट खूप बोलकी आहे. याचाच अर्थ शिवसेनेला भाजपासोबत परतीचे दोर पूर्णपणे कापायचे नाहीत.

त्याचे कारणही उघड आहे काँग्रेस व खास करून राष्ट्रवादी काँग्रेस व त्याच्या नेत्यांबद्दल असलेला काहीसा अविश्वास. शिवसेनेचा हा नेता म्हणाला की सध्या पक्षाच्या वतीने माध्यमांसमोर खिंड लढवणारे राज्यसभेचे खासदार व सामनाचे संपादक कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हा यांच्यावर तोंडसुख घेताना नरेंद्र मोदींची केलेली स्तुती याच्याकडे याच अनुषंगाने बघायला हवे.

“काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबतचे संबंध म्हणजे लबाडाघरचं अवताण आहे, जेवल्याशिवाय काय खरे नाही. त्यामुळे भाजपासोबत परतीचे दोर पूर्णपणे कापणे हे अव्यवहार्य आहे,” हे त्या नेत्याचे अनुभवाचे बोल.

अर्थात घोडामैदान जवळच आहे. त्यामुळे, शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वर ठेवलेला विश्वास सार्थ ठरतो का नाईलाजाने का होईना पक्षाला नमते घेऊन पुन्हा भाजपसोबत सत्तेसाठी सलगी करावी लागते हे लवकरच कळेल.