करोनाच्या पार्श्वभूमीवर परत निघालेल्या परप्रांतीय कामगारांना ते सध्या आहेत त्या ठिकाणी थांबवण्यात आले आहे. प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेत त्यांच्या समुपदेशनासाठी आध्यात्मिक व अन्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना दिलासा दिला जात आहे.

लॉक डाऊनमुळे जिल्ह्यातील अनेक उद्योग ठप्प पडले आहेत. या उद्योगात कार्यरत हजारो परप्रांतीय कामगार व मजूरांनी आपल्या गावाकडे परत जाण्याचा मार्ग पत्कारला होता. रात्रीतून होणारे हे पलायन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थांबविण्यात प्रशासनाला यश आले. आता हे सर्व कामगार विविध निवारागृहात थांबलेले आहेत. बच्छराज, अग्रसेन धर्मशाळेत थांबलेल्या या कामगारांसाठी विरंगुळा म्हणून विविध प्रबोधनपर कार्यक्रम आजपासून सुरू करण्यात आले आहेत. आज गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कामगारांना राष्ट्रसंतांची हिंदीतील भजनं ऐकविली. महाराजांनी सांगितलेला बंधुत्वाचा, सामाजिक सलोख्याचा व राष्ट्रभक्तीचा संदेश कार्यकर्त्यांनी सांगितला. खंजेरीच्या तालावर झालेल्या भजनात हा कामगारवर्ग तल्लीन झाल्याचे चित्र दिसून आले. दिवसभर कष्ट करून झोपडीत विसावणाऱ्या या कष्टकऱ्यांना असा आध्यात्मिक प्रसाद प्रथमच मिळाल्याचे त्यांचे प्रमुख रामप्रसाद तिवारी यांनी सांगितले.

या स्थलांतरितांना केवळ निवास व भोजन देणे पूरेसे नाही. त्यांना मनशांती मिळावी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना केली होती. या मध्ये वर्धेतील भजन मंडळाचे योगदान महत्वाचे ठरल्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी नमूद केले. पुढील दिवसांत समुपदेशक पंकज वंजारे, पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, निरूपणकार डॉ. नारायण निकम यांचे मार्गदर्शन वर्धेत थांबलेल्या कामगारांना मिळणार आहे.