रायगड पोलिसांकडून अलिबाग येथे जंतुनाशक फवारणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. बाजारात येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ही यंत्रणा कार्यरत असणार आहे. जिल्ह्यात १० प्रमुख बाजारपेठांमध्ये अशी यंत्रणा पोलीस दलामार्फत बसविली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिली.

अलिबाग येथील भाजी मार्केट आणि मच्छीमार्केट परिसरात ग्राहकांची नियमित वर्दळ असते. मात्र अशाच गर्दीच्या करोना विषाणूचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये जंतुनाशक फवारणी यंत्रणा रायगड पोलिसांमार्फत बसविली जात आहे. अलिबाग येथे नुकतीच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. सोडीयम हायपोक्लोराईड या जंतुनाशकांचा वापर केला जाणार आहे. बाजारात येणाऱ्या आणि जाणाऱ्या ग्राहकांवर या जंतुनाशकांची फवारणी केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा सोमवारपासून कार्यान्वित करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम आणि अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.डी कोल्हे उपस्थित होते. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लय़ानुसारच ही फवारणी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. लवकरच जिल्ह्यातील १० ठिकाणी अशीच यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पारस्कर यांनी दिली.