गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आजवरच्या कार्याचा गौरव करतानाच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ओळखतसुध्दा नाही, अशी टिप्पणी करून आध्यात्मिक गुरू व आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडविली आहे.
काँग्रेसच्या महापौर संगीता अमृतकर यांच्या पुढाकाराने चंद्रपूर आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने हॅप्पीनेस कार्यक्रमासाठी श्री श्री रविशंकर आले होते. चांदा क्लब ग्राऊंडवरील सत्संग कार्यक्रमापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री मोदी अतिशय उत्कृष्ट काम करीत आहेत. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ओळखतसुध्दा नाही, असेही ते म्हणाले.  देशातील राजकीय परिस्थिती सध्या चांगली नसली तरी केंद्रात भ्रष्टाचारमुक्त स्थिर सरकार यावे, देशातील जनता भ्रष्टाचाराला त्रासलेली आहे. आज सत्ताधारी व विरोधी दोन्ही पक्षात चांगली माणसे आहेत. परंतु राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे  गुंड लोक समोर आल्याने चांगली माणसे दबली गेली असे ते म्हणाले.