लॉकडाउननंतर आता पूर्वीप्रमाणे मीटर रिडींग घेऊन वीजबिल देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलतही राज्य शासनाने उपलब्ध करुन दिली आहे, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.

करोना लॉकडाउनमुळे घरोघरी जाऊन मीटर रिडींग घेणे तीन महिन्यांपासून बंद करण्यात आले होते. या काळात मागील रिडींगच्या आधारे अंदाजे वीजबिलं नागरिकांना पाठवण्यात आली होती. मात्र, आता लॉकडाउन शिथील झाल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे वीजबिलं देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, जून महिन्याचे वीजबिल अशा प्रकारे रिडींग घेऊन आकारले जाणार आहे. हे बील नागरिकांना सुलभ हप्त्याने देखील भरता येणार असून त्यासाठी स्थानिक वीज कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा- खूशखबर! महावितरणमधील ७,००० जागा आठ दिवसांत भरणार; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

वीजबिलाच्या पडताळणीसाठी विशेष लिंक

विशेष म्हणजे वीज ग्राहकांना https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवरून वाढीव वीजबिलांची पडताळणी देखील करता येणार आहे. मीटर रिडींग चुकल्याने, अन्य कारणाने चुकीचे वीजबिल गेल्यास ते दुरुस्त करण्यात येईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रलंबित भरती प्रक्रियेचा आठ दिवसात निकाल

दरम्यान, महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून दोन हजार उपकेंद्र सहायक व पाच हजार विद्युत सहाय्यकांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली होती. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून ८ दिवसांत संबंधितांना रूजू करून घेण्याचे आदेशही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.