२९ वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक अतुल देशपांडे तर द्वितीय क्रमांक ठाण्याचा अविनाश भगत आणि तृतीय क्रमांक विशाल सिहानी यांनी पटकाविला आहे. सावंतवाडीत २३ व २४ जानेवारी रोजी हे संमेलन होत आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने छायाचित्र व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा निकाल आज पत्रकार परिषदेत प्रा. धीरेंद्र होळीकर यांनी जाहीर केले. यावेळी डॉ. गणेश मर्गज, प्रा. सुभाष गोवेकर आदी उपस्थित होते.
शालेय गट निबंध स्पर्धेत प्रथम तन्वी संतोष चव्हाण, द्वितीय करुणा कृष्णा देसाई, तृतीय श्रुती सावंत, उत्तेजनार्थ विनिता पांजारी, हर्षदा किशोर वालवलकर, तृतीय माधुरी चव्हाण, उत्तेजनार्थ अनुजा सोनार, सृष्टी पोवार यांनी क्रमांक पटकाविला. संमेलनास्थळी सर्वाचा गौरव करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. बॅ. नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे दि. २३ व २४ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाला सुमारे ४०० निमंत्रित प्रतिनिधी येतील, असे सांगण्यात आले.
या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सांगलीचे पक्षी आवाज तर शरद आपटे आहेत. संमेलनाचे उद्घाटन सावंतवाडी संस्थाच्या राजमाता श्रीमंत सत्त्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, नगराध्यक्ष बबन साळगावकर, महाराष्ट्र पक्षिमित्र अध्यक्ष आम. काटदरे, उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित राहाणार आहेत.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सचिन यांचे पक्षीजगत तर पक्षी छायाचित्र प्रदर्शन उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्या हस्ते होईल.
यावेळी दि. २३ जानेवारी रोजी पक्षी व पर्यटन याविषयीची मांडणी होईल. दुपारच्या सत्रात पक्षी आणि पर्यावरण, पक्षीसंवर्धन, सायंकाळी जखमी पक्षांवर प्रथमोपचार व पक्षी संवर्धनातील कायदेशीर बाबी, रात्रो ८ वाजता पक्षांवरील माहितीपट असा उद्घाटनदिनीचा कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.
या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ते ८.३० वा. पक्षीनिरीक्षण नरेंद्र डोंगर व बेळगाव रोड येथे होईल. त्यानंतर सकाळी १० वा. पक्षीनिरीक्षण पद्धती व शास्त्रीय अभ्यास, त्यानंतर स्थलांतरित पक्षी, पश्चिम घाटातील संकटग्रस्त पक्षी प्रजानी आदी विषयावरची मांडणी होईल.
या संमेलनाचा समारोप सामाजिक वनीकरण उपसंचालक सौ. स्नेहल पाटील यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी संमेलनाध्यक्ष शरद आपटे, भाऊ काटदरे, सुधीर राणे आदी उपस्थित असतील असे सांगण्यात आले.
सावंतवाडीत होणाऱ्या या संमेलनास राज्यभरातून पक्षिमित्र प्रतिनिधी येणार आहेत. सुमारे ४१० प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. सिंधुदुग जिल्ह्य़ाच्या पश्चिम घाट (सह्य़ाद्री पर्वत) आणि सागरी किनारपट्टी भागात दुर्मीळ पक्षी प्रजाती आहेत. सुमारे २५० ते ३०० प्रजातीचे पक्षी आढळून येतात, असे प्रा. धीरेंद्र होळीकर म्हणाले.