राज्याचा अर्थसंकल्प फसवा आहे. शेतकऱ्यांसाठी भावनिक होऊन शब्दांचा खेळ मांडणाऱ्या अर्थसंकल्पात पोटाला अन्न मिळावे म्हणून योग्य तरतूद केलेली नाही. विकास दर वाढविणारी चुकीची आकडेवारी दिल्याने त्याला आक्षेप आहे, असे काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने अर्थसंकल्पावर चर्चा ठेवण्यात आली होती. त्या वेळी नारायण राणे बोलत होते. या कार्यक्रमाला पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अर्थराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहिले नाहीत. शेतकऱ्यांच्या किंवा कृषीच्या सर्व योजनांची बेरीज केली तरीदेखील २५ हजार कोटींची बेरीज होत नाही. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भावनिक होत आकडय़ांचा खेळ केला तरी पोटाला अन्न कसे देणार हे सांगितले नाही, असे राणे म्हणाले. साडेतीन हजार कोटीपेक्षाजास्त तूट असल्याने राज्याचा विकास दर ८ टक्के राहू शकत नाही, असे ते म्हणाले.  जागतिक पातळीवर पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे कर कमी झाला. त्यात अकराशे कोटींची तूट, व्हॅटमध्ये दोन हजारांची तूट, एलबीटी धनदांडग्या व्यापाऱ्यांसाठी रद्द केला. हा आर्थिक भरुदड पाहता जुन्या करप्रणालीनुसार राज्याचा विकास दर आठ टक्के नव्हे तर सहा ते सव्वासात टक्के इतकाच राहील. त्याशिवाय ११ ते १२ हजार कोटींपर्यंत तूट जाते. साडेतीन टक्के तूट दाखविली ती भरून काढून विकास दर आठ टक्के आणणार असे म्हटले तरी ते शक्य नाही, असेही ते म्हणाले. राज्याच्या अर्थसंकल्पात आकडय़ांचा खेळ खेळला गेला तरी पुढील वर्षी ही तूट २० हजार कोटी पर्यंत जाईल, असे राणे म्हणाले. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आठ अब्ज ५ लाख उद्योग निर्मितीखाली आले म्हणतात, पण राज्यात वीज, पाणी, रस्ते या सर्व आघाडय़ांवर अपयश आले आहे. विदर्भ, मराठवाडय़ात पाणी नाही, त्यामुळे प्रकल्पांना पायाभूत सुविधाच नाहीत. तर उद्योग कसे येणार असे प्रश्न त्यांनी या वेळी केला.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस लोकांना फसवीत आहेत. या दोन्ही सरकारांनी देशात आणि राज्यात विकासाला दूर ठेवले आहे. त्यामुळे दिशाभूल करणारी वक्तव्ये ते करीत आहेत, असे शेवटी राणे म्हणाले. सिंधुदुर्ग प्रेस क्लब अध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रास्ताविक, तर संदीप सावंत व अनंत जाधव यांनी स्वागत केले. या वेळी आमदार नीतेश राणे, डॉ. जयेंद्र पसळेकर आदी उपस्थित होते.