मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू

राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.

भाजपच्या महाजनादेश यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आमच्या यात्रेनंतर अनेक पक्षांना उत्साह आला. त्यांनीही यात्रा काढल्या आहेत. अशा प्रकारच्या यात्रा काढण्याची परंपरा भाजपची आहे. काँग्रेसची भ्रष्टाचाराची जत्रा निघाल्यामुळे त्यांना यात्राच बंद करावी लागली, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला गुरुवारपासून धुळे, नंदुरबारपासून सुरुवात केल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. धुळ्यातून सुरू झालेल्या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा सोलापूर येथे समारोप होणार आहे. तिसरा टप्पा १३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत कोकण विभागात काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भाजपमध्ये प्रवेश देताना कार्यकर्त्यांसाठी मुक्तद्वार असेल, तर नेत्यांना चाळणी लावूनच प्रवेश दिला जाईल. कोणाला पक्षात घ्यायचे हे तपासूनच घेतले जाईल. मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून धुळ्याच्या विकासासाठी भविष्यातही निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. लोकांना हेच सरकार आपल्या अपेक्षा पूर्ण करेल याची खात्री आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास मुख्यमंत्री  फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची दिल्लीत विटंबना करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी निषेध केला.

‘मुख्यमंत्री, हे कर्ज माफ आहे का?’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्त येथे करण्यात आलेल्या ‘रोड शो’वर एका शेतकऱ्याने कर्जमाफीसंदर्भातील निवेदने भिरकावली. निवेदनात ‘मुख्यमंत्री, आपण एमबीए असून हे कर्ज माफ आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. शहरातून गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी रोड शो केला. रोड शो वेळी प्रारंभी मोटारसायकल फेरी महात्मा गांधी पुतळ्यासमोरून मोठय़ा पुलावरून मार्गस्थ होत असताना एका शेतकऱ्याने दुचाकीस्वारांवर काही पत्रके भिरकावली. या पत्रकावर धनराज विजय पाटील यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्रच्या कापडणे (ता.धुळे) शाखेत असलेल्या खात्यातील कर्जाचा तपशील  आहे. निवेदनावर शेवटी विजयकुमार व्यंकटराव पाटील रा. भिडेबाग, देवपूर, धुळे असा उल्लेख आहे.