दोन दिवस पुराच्या पाण्यात असाल तरच मदत यासंबंधीच्या जीआरचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमध्ये जाऊन पूर स्थितीचा आढावा घेतला त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना जीआर संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आघाडीच्या काळातला जीआर सात दिवसांचा होता. दोन दिवस पाण्यात बुडालं तरच अन्नधान्य मोफत दिलं जाईल अशा आशयाचा जीआर सरकारने जारी केला. मात्र या जीआरची मर्यादा आधी सात दिवसांची होती मात्र या जीआरचा अर्थ चुकीचा काढण्यात आला असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पूरग्रस्त असाल तर दोन दिवस पाण्यात राहण्याची अट नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

तसेच आता शक्य आहे तिथे रोखीनेच मदत केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी १५४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र आता शक्य आहे तिथे रोखीनेच मदत केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसंच काही वेळासाठी पुरात अडकला असाल तरीही मदत केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शनिवारी सांगलीमधील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त भागात केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. विरोधकांनी राजकारण करु नये उणिवा जरुर दाखवाव्यात असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.