एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याऐवजी प्रशासनाकडून संप चिघळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप एसटी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटेंनी म्हटले आहे. ‘संप मिटवण्यासाठी सरकारने जबरदस्ती केल्यास आम्ही कुटुंबीयांसह राज्यभर जेलभरो आंदोलन करु,’ असा इशाराही तिगोटेंनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
‘एसटी प्रशासनाकडून संप चिघळवण्याचा प्रयत्न होतो आहे. विविध आगारांमधून कर्मचाऱ्यांना हाकलवून दिले जात आहे. त्यासाठी दमदाटी केली जात आहे. परिपत्रक काढून होमगार्ड्सची भरती करुन एसटी काढल्या जात आहेत. काल दिलेल्या प्रस्तावानुसार आम्हाला ४ ते ५ हजारांची पगारवाढ मिळेल. त्यामुळे आमचा पगार १२ ते १३ हजार रुपये होईल. मात्र या पगारातून आमच्या मूलभूत गरजा भागणार नाहीत,’ अशी व्यथा इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटेंनी मांडली. ‘इतर राज्यांमधील एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, ही आमची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहेत. त्यांनी चर्चेसाठी बोलावल्यास आम्ही तयार आहोत,’ असेही ते म्हणाले.
गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत राज्यभरात प्रवाशांचे हाल सुरु आहेत. या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता आहे. आज दुपारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना संपाबद्दलची माहिती दिली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री मध्यस्थी करणार की प्रवाशांचे हाल सुरुच राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याआधी एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. कर्मचारी संघटना सातव्या वेतन आयोगावर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत तडजोड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने तिसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिला.