रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी अध्यक्ष पार्थो दासगुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे प्रकरण आता अधिकच तापणार असल्याचं दिसत आहे. काँग्रेसने यावरून आक्रमक भूमिका घेतील असून, अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी उद्या(शुक्रवार) काँग्रेसकडून राज्यव्यापी धरणे आंदोनल केले जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी विविध ट्विट करत म्हटले आहे की, “रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला.” ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी याची माहिती अर्णब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्याने स्वतः सांगितले आहे की ज्याने त्याला ही माहिती दिली, तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे आहे.”

तसेच, “अर्णब गोस्वामीचे कृत्य हे Official Secrets Act, 1923, Sec. 5 नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच, पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस उद्या(शुक्रवार) राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून, दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्सी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. TRP घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.” अशी देखील थोरात यांनी मागणी केली आहे.

अर्णबच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करा – काँग्रेसची मागणी

“दूरदर्शनने माहिती प्रसारण मंत्र्यांकडे यासंदर्भात तक्रार केली असता त्यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणात दिसून येते. याचाच अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला पाठिंबा आहे. त्यामुळेच जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या अर्णब गोस्वामीविरोधात केंद्र सरकारने कारवाई केली नाही का?” असा प्रश्न देखील बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

अर्णब गोस्वामींना तात्काळ अटक करा!; महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे काँग्रेसची मागणी

याशिवाय, “या व्हॉट्स अप चॅटवरून अर्णब गोस्वामीचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध आहेत असे दिसते. अनेक मंत्री व उच्चपदस्थांनी त्याला नियमाच्या पलिकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचे समोर येत आहे.” असे देखील थोरात यांनी म्हटले आहे.