परभणीत राष्ट्रवादी भवनावर झालेल्या दगडफेक प्रकरणी शासकीय आदिवासी वसतिगृहातील २१ युवकांना नवा मोंढा पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादीच्या या पाठिंब्यामुळे आदिवासी समाजात असंतोष निर्माण होऊन रविवारी सायंकाळी आदिवासी युवकांनी वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी भवनावर हल्लाबोल केला. या वेळी जोरदार दगडफेक होऊन भवनाच्या दर्शनी भागातील काचा फोडल्या. पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
नवा मोंढा पोलीस ठाण्यात या हल्ल्यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर रात्रीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यां आदिवासी युवकांची धरपकड सुरू केली. गजानननगरमधील शासकीय आदिवासी वसतिगृहावर जाऊन पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले. मात्र, साहेब मुस्के, संतोष चाकोते, सुनील खुपसे, हनुमान या निरपराध विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप आदिवासी विकास परिषदेचे कुंडलिक कसबे व भाकपचे राजन क्षीरसागर आदींनी केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये काही अल्पवयीन विद्यार्थी असल्यामुळे त्यांचे नाव गुन्ह्यातून काढून टाकावे, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. या गुन्ह्याचे तपासणी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक लांडगे यांनी राष्ट्रवादी भवनावरील दगडफेक प्रकरणी अटक झालेल्या २१जणांना दुपारनंतर न्यायालयासमोर हजर केले.