काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होईल याबाबत पक्षांतर्गत चांगलीच घुसळन सुरु असून पक्षाच्या नेत्यांमध्येच दोन गट निर्माण झाले आहेत. यांपैकी काहीजण अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यावर ठाम आहेत तर ज्येष्ठ नेत्यांची मते सर्वसंमतीने राहुल गांधींचीच पक्षाध्यपदी निवड व्हावी ही भूमिका आहे. काँग्रेसमधील हा पक्षांतर्गत वाद गेल्या आठवड्यात चांगलाच गाजला. या वादामध्ये आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. सामना या वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून त्यांनी यावर भाष्य केलं आहे. राहुल गांधींना रोखल्यास काँग्रेस संपेल असे भाकित त्यांनी केले आहे.

संजय राऊत लेखात म्हणतात, काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याने चांगलाच राजकीय धुराळा उडाला. राजकारणात असे पत्रव्यवहार नेहमी होत असतात. काँग्रेस नेत्यांची ही मागणी योग्यच असली तरी राहुल गांधींना रोखण्याचा प्रकारही सुरु असल्याचे राऊत यांनी सूचकपणे म्हटले आहे. याच्या परिणामावर भाष्य करताना राहुल गांधींना रोखण्याची सक्रियता काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करणारी ठरेल असे महत्वाचे विधानही त्यांनी केले आहे.

यापूर्वी अनेक वादळातून आणि पडझडीतून काँग्रेस पुन्हा उभी राहिली. मात्र, आज जर पक्षात वादळ आले तर त्याची पडझड होईल इतकीही काँग्रेस सध्या दिसत नाही. काँग्रेसमधील २३ नेत्यांनी सोनिया गांधींकडे पत्राद्वारे पक्षाच्या या नाजून अवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. पक्षाविषयीची अस्थिरता आणि शंकाकुशंकांना पूर्णविराम देण्यासाठी पक्षाला कायमस्वरुपी सक्रिय नेतृत्व मिळावी अशी अपेक्षा या नेत्यांनी व्यक्त केली. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ताकदीने उभे राहिल असे नेतृत्व काँग्रेसमध्ये दूरदूरपर्यंत दिसत नाही. मात्र, सोनिया गांधी रुग्णालयात असताना त्यांना पत्र पाठवून त्यावर पुन्हा स्मरणपत्रे पाठवून त्यांना हंगामी नेतृत्व सोडण्यास प्रवृत्त करण्याचा त्यांचा डाव राहुल गांधींनी हाणून पाडला. मोदींना देश काँग्रेसमुक्त करायचं स्वप्न होतं. मात्र, ते होऊ न शकल्याने ते आता काँग्रेस पक्ष गांधी परिवारमुक्त करायचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी कॉर्पोरेट लॉबीचा वापर केला जात आहे. राहुल गांधी हे केंद्र सरकारवर टीका करताना अनेक उद्योगपतींवरही टीका करीत आहेत. म्हणूनच त्यांनी हा डाव टाकला आहे. मात्र, तो सफल झाला नाही असे काँग्रेसमधील मोठ्या गटाचे म्हणणे असल्याचे राऊत सांगतात.

गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष व्हावा हा विचार चांगला आहे. पण सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या त्या २३ जणांपैकी एकातही ती कुवत नाही. काँग्रेससाठी गांधी परिवाराने रक्ताचे सिंचन केले आहे. नरसिंह राव, सीताराम केसरी हे गांधी परिवाराबाहेर अध्यक्ष झाले होते त्यांच्या काळात काँग्रेस रसातळाला गेली. मात्र, सोनिया गांधींनी पक्षाची धुरा यशस्वीरित्या सांभाळल्यानंतर या पक्षाने पुन्हा उभारी घेतली.

काँग्रेसच्या दिशाहिन आणि नेतृत्वहीन परिस्थितीला त्यांची बेगडी धर्मनिरपेक्षताच कारणीभूत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी आहे याची खदखद काही काँग्रेसजनांच्या मनात आहे. अशा लोकांना काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची नाही तसेच नवे नेतृत्वही निर्माण होऊ द्यायचे नाही, असा आरोपही संजय राउत यांनी केला आहे. तरुण वर्गाला काँग्रेसचे आकर्षक का वाटत नाही याची मिमांसा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्यांनी करायला हवी, असेही त्यांनी सुचवले आहे. काँग्रेस ही न मरणारी म्हातारी असल्याचे बॅ. विठ्ठलराव गाडगीळ म्हणाले होते, असं सांगताना आता या म्हतारीचं करायचं काय हे राहुल गांधींनीच ठरवायला हवे, असा सल्लाही संजय राऊत यांनी रोखठोकमधून दिला आहे.