News Flash

सावरखेड गावात तणावपूर्ण शांतता

नायगाव तालुक्यातील सावरखेड हे गाव मागील अनेक वर्षांपासून संवेदनशील म्हणून ओळखल्या जाते.

संग्रहीत छायाचित्र

दोन गटात तुंबळ मारहाणीची घटना

पोलीस दप्तरी संवेदनशील म्हणून नोंद असलेल्या नायगाव तालुक्यातील सावरखेड येथे एकाच समाजातील दोन गटात ५ मे रोजी सायंकाळी कंदुरीच्या कार्यक्रमात जुन्या वादावरून तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये २५ जण जखमी झाले. याप्रकरणी परस्परांच्या तक्रारीवरून ४६ जणांविरुध्द कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले आहेत. यातील १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सावरखेड गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नायगाव तालुक्यातील सावरखेड हे गाव मागील अनेक वर्षांपासून संवेदनशील म्हणून ओळखल्या जाते. येथे महापुरुष व राष्ट्रपुरुषांच्या जयंती व उत्सवाच्या कारणावरून यापूर्वीही हाणामाऱ्या झालेल्या आहेत. पण एकाच समाजातील दोन गटात किरकोळ कारणावरुन हाणामारी झाली असली तरी या हाणामारीला बरेच राजकीय कंगोरे असून. अनेक दिवसांपासून धुमसत असलेला वाद कंदोरीच्या निमित्ताने उफाळून आला. सावरखेड येथे बौध्द समाजाची ७० ते ८० घरे असली तरी यांच्यात उघड उघड दोन गट पडले असून यंदा पहिल्यांदाच स्वतंत्र जयंतीही झाली.

या स्वतंत्र जयंत्या झाल्यानंतर येथे तणाव निर्माण झाल्याची बाब पोलीस विभागाच्या निदर्शनास आली होती; पण नेहमीच बेफिकीर असलेल्या कुंटूर पोलिसांनी या प्रकाराला गांभीर्याने घेतलेच नाही. त्यामुळे एकाच समाजातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दगड, काठय़ा व मिरची पावडरचा मुक्तपणे वापर करण्यात आला असल्याने २५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सदर हाणामारी प्रकरणी मधुकर पिराजी कदम यांच्या तक्रारीवरून २३ जणाविरुद्ध तर संजय राजेश कदम यांच्या तक्रारीवरूनही २३ जणांविरुद्ध अशा एकूण ४६ जणांवर कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील १९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे व जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना यांनी सावरखेड येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

दरम्यान या हाणामारीच्या प्रकरणानंतर सावरखेड येथे तणावपूर्ण शांतता असली तरी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बेफिकीर पोलीस

सावरखेड प्रकरणी कुंटूर पोलीस बेफिकीर तर होतीच पण या प्रकरणाची माहितीही सांगण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपला भ्रमणध्वनी बंद करुन ठेवला तर पोलीस ठाण्यातील फोनचे रिसिवरही बाजूला ठेवण्याचा प्रकार केल्याने बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, कंदोरीचा कार्यक्रम हा हाणामारीसाठी कारणीभूत ठरला असला तरी यामागे राजकीय व जुने वाद असून. ४६ पकी १९ आरोपींना अटक केली व उर्वरित २७ आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे  सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 1:56 am

Web Title: stressful silence in sawarkhed village
Next Stories
1 पारनेरला गारपिटीने झोडपले, फळबागा उद्ध्वस्त
2 जलयुक्त शिवारच्या कामाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करण्याची सूचना
3 स्थानिकांनीच कोकणचे सोने केले पाहिजे – सुमित्रा महाजन