रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या किनारपट्टीवर बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या मिनी पर्ससीन नेट बोटींविरुद्ध धडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी गुरुवारी दिले.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अधिकृत यांत्रिक नौकांव्यतिरिक्त सुमारे साडेतीनशे अनधिकृत मिनी पर्ससीन नौका किनाऱ्यालगतच्या भागात बेकायदेशीरपणे मच्छीमारी करतात. असा पारंपरिक मच्छीमारांचा आरोप असून त्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून या मच्छीमारांनी आंदोलन छेडले आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र त्यानंतरही समुद्रात बेकायदेशीर मच्छीमारी अर्निबधपणे चालूच राहिली आहे. म्हणून अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या वेळी सुमारे सव्वाशे पारंपरिक मच्छीमारांनी स्वत:ला अटक करून घेतली. त्यापूर्वी राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल, रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष खलिल वस्ता व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. किनारपट्टीच्या भागात चालणाऱ्या बेकायदेशीर यांत्रिक मच्छीमारीमुळे छोटय़ा, पारंपरिक मच्छीमारांची उपजीविका धोक्यात आली असल्याचे या नेत्यांनी निदर्शनास आणून दिले आणि त्यांच्याविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करून पायबंद घालण्याची मागणी केली. त्यावर, संबंधित बेकायदेशीर नौकांचा तपशील कळवल्यास निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.