चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या दुर्गम जिवती तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिक्षक आणि इतर सुविधांचा अभाव असल्याच्या कारणापोटी, शनिवारी ध्वजारोहणानंतर लगेच कनिष्ठ महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.जिवती तालुक्यातील दामापूर खेडय़ात असलेल्या विठ्ठलराव जाधव कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या कृष्णा राठोड (१९), प्रेमदास राठोड (१८), प्रफुल्ल राठोड (१७) आणि प्रवीण जाधव (१८) या चार विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी आपल्यासोबत आणलेल्या बाटल्यांमधील कीटकनाशक प्यायले. शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना राजुरा या तालुक्याच्या ठिकाणी हलवले व तेथील डॉक्टरांनी या मुलांच्या आतडय़ांमधील विषारी द्रव्य बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. यानंतर त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येते.
या विद्यार्थ्यांच्या खिशांमध्ये सापडलेल्या चिठ्ठय़ांमध्ये त्यांनी शाळेत शिक्षकांसह इतर सोयींचा अभाव असल्याच्या तक्रारी लिहिल्या होत्या, असे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी सांगितले. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर, बल्लारपूरचे आमदार व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही सरकारी अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. प्रवीणने आपला वाढदिवस असल्याचे सांगून खिशातील चॉकलेट्स मुनगंटीवार यांना देऊ केली.
ही खासगी अनुदानित शाळा चालवणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जोश आणण्यासाठी दिलेल्या भाषणात, स्वातंत्र्यदिनी लढण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. अशा शाळांमध्ये सुविधांचा अभाव ही बाब देशभरात सामान्य आहे, परंतु या प्रकरणातील अधिक गंभीर बाब अशी की, विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करवून घेण्यासाठी कुठलाच मार्ग उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलणे भाग पडले. सुविधांच्या अभावापेक्षा, शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे ते निराश झाले होते, असे सामाजिक कार्यकर्त्यां पारोमिता गोस्वामी यांनी सांगितले.प्रत्येक शाळेत पालकांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ, महिला, अनुसूचित जाती व जमाती, पंचायत सदस्य यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली शाळा व्यवस्थापन समिती असणे अनिवार्य मानले जाते; परंतु या समित्या एक तर निष्क्रिय असतात किंवा केवळ कागदावरच राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याची शाळेच्या पदाधिकाऱ्यांची प्रवृत्ती असते, असेही त्या म्हणाल्या.