वाई : तुकाईवाडी (ता. सातारा) येथील सुशिक्षित तरुणाने बेरोजगारी घालविण्यासाठी शेळीपालनातून कुटुंबखर्च भागविण्याचा निर्णय घेतला. नुकताच त्याने शेळीपालनात व्हॉट्स अ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून शेळीची प्रसूती यशस्वी रीत्या करून तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केल्याची घटना तुकाईवाडी (ता. सातारा) येथे नुकतीच घडली.

तुकाईवाडी (ता.सातारा )येथील शाहिद जुबेर मुलाणी हा सुशिक्षित तरुण शेळीपालन व्यवसाय करत आहे. त्यातूनच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यासाठी कोपर्डे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या डॉ.अनिल घाडगे यांचे सहकार्य असते. बऱ्याचदा आजारपणात उपचारासाठी त्यांच्याशी संपर्कात राहावे लागते. शासकीय सुटीच्या दिवशी शाहिदला शेळीच्या प्रसूतीची लक्षणे दिसल्याने त्याने डॉ. घाडगे यांच्याशी संपर्क साधला. शेळीपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार होता. त्या वेळी शेळीची सद्य:स्थिती जाणण्यासाठी त्यांनी व्हिडीओ क्लीप पाठविण्यास सुचविले. शेळीची प्रसूती तत्काळ होणे आवश्यक असल्याचे ठरले. म्हणून डॉक्टरांनी व्हिडिओ कॉल सुरूच ठेवून प्राथमिक सूचना देऊ न शाहिद यास प्रसूती करण्यास सांगितले. शेळीच्या पिलाचे तोंड विरुद्ध दिशेस असल्याचे जाणवले. दरम्यान शाहिद व त्याच्या पत्नीस धीर देऊ न सूचना देऊन प्रसूती यशस्वी रीत्या करण्यात आली.

थ्री इडिएट्स या चित्रपटात एका दृश्यात असेच घडल्याचे सर्वानी पाहिले होते. पण फक्त मोबाइलवर ऐकून प्रत्यक्षात शेळीची प्रसूती करण्याचा प्रसंग अंगावर शहारे आणणारा होता.

 – शाहिद मुलाणी, तुकाईवाडी (ता.सातारा)

प्रगत तंत्रज्ञानामुळे शेळी व तिचे करडू वाचवता आल्याचे समाधान नक्कीच आहे. पशुसंवर्धन विभागातून सेवा करण्याचा आनंद मिळत असतो.

 – डॉ. अनिल घाडगे,  पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना, कोपर्डे (सातारा)