बॉलीवुडच्या तिकीटबारीवरचा फलक गेल्या वर्षी नायिकाप्रधान चित्रपटांनी हलता ठेवला होता. दीपिका पदुकोणच्या ‘पिकू’ पासून सुरू झालेला हा सिलसिला वर्षभर कायम होता. नायिका मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांक डून चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात आल्यामुळे असेल. पण यावर्षी सुरुवातीपासूनच नायिकाप्रधान चित्रपटांची चर्चा सुरू आहे. सोनम कपूरच्या ‘नीरजा’ने पहिल्याच आठवडय़ात चांगली कमाई केली असल्याने या चित्रपटांविषयी आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.
जानेवारीतच शबाना आझमी आणि जुही चावला यांचा ‘चॉक अँड डस्टर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शाळांमधून चालणाऱ्या राजकारणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला समीक्षकांकडून पसंती मिळाली. पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या अभिषेक कपूर दिग्दर्शित कतरिना कैफ आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फितूर’ हाही चित्रपट खऱ्या अर्थाने नायिकाप्रधान चित्रपट होता. खरे म्हणजे प्रेमकथा असे या चित्रपटाचे वर्णन करण्यात आले होते. प्रत्यक्षात हा सिनेमा बेगम (तब्बू) आणि तिची मानलेली मुलगी फिर्दोस (कतरिना कैफ) यांच्या नात्याभोवती गुंफलेला होता. पण गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘नीरजा’ या चित्रपटाने तिकीटबारीवर खरी कमाल साधली आहे. ‘अल पॅम ७३’ हे विमान हायजॅक झाल्यानंतर आपला जीव धोक्यात घालून प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या हवाईसुंदरी नीरजा भानोतची शौर्यकथा प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही भावली आहे. या चित्रपटाची सगळी मदार ही नीरजाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूरवर होती. या चित्रपटाने पहिल्या आठवडय़ात ३५.३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शिवाय, दुसऱ्या आठवडय़ातही चित्रपट सुरू राहणार असल्याने ‘नीरजा’ आणखी चांगली कमाई करेल, असा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात प्रकाश झा दिग्दर्शित प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित चित्रपट ‘जय गंगाजल’ प्रदर्शित होतो आहे. अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राचा वकूब वाढला आहे. आपल्या वाटय़ाला सशक्त भूमिका येत असेल तर त्या चित्रपटाची जबाबदारी एकटीने पेलण्याएवढा विश्वास आजच्या अभिनेत्रींमध्ये आहे. त्यांचा तोच विश्वास प्रेक्षकांना चित्रपटांपर्यंत घेऊन येतो, असे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले. प्रियांका यात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आर. बाल्की दिग्दर्शित ‘की अँड का’ हा नायिका प्रधान चित्रपटांमध्येही एक वेगळे पाऊल ठरणार आहे.
कॉर्पोरेट कंपनीत मोठय़ा पदावर काम करून घराचा आर्थिक भार उचलणारी नायिका आणि घर सांभाळण्याची भूमिका स्वत:कडे घेणारा नवरा असे नवे नाते या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. याशिवाय, पूजा भट्ट दिग्दर्शित ‘कॅ ब्रे’, ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजित’, करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्कील’ सारख्या चित्रपटांच्या कथाही स्त्री केंद्री असल्याने वेगळ्या वळणावरचे नायिकाप्रधान चित्रपट यावेळी पहायला मिळणार आहेत.