प्रशांत देशमुख

वर्धा : करोना काळातील अति दक्षतेच्या पार्श्वभूमीवर मरणप्राय वेदना अनुभवणाऱ्या एका तरूण रूग्णावर जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात सावंगीच्या रूग्णालयातील शल्य चिकित्सकांना यश आले आहे.  सिकलसेल व्याधीने त्रस्त व त्यातच पोटदुखीच्या वेदना सहन करणाऱ्या कारंजा तालुक्यातील धीरज निकोसे याने आता सुटकेचा श्वाास घेतला आहे. या अठरा वर्षीय तरूणास पाच वर्षांपूर्वी बंगळुरु येथे पित्ताशयातील संसर्गावरील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र येथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोनच वर्षात त्याच्या पित्ताशयाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे पालकांनी त्याला हैदराबादच्या नामांकित रूग्णालयात कोलेडोकोलिथोटॉमी म्हणजेच पित्ताशय नलिकेला छेद देऊन केल्या जाणाऱ्या उपचारांसाठी दाखल केले.

तिथे या तरुणाच्या पित्त नलिकेतला खडा काढून उपचार करण्यात आले. मात्र या उपचारानंतरसुध्दा वेदना सुरूच राहल्याने त्याला नागपुरातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार होवूनही वेदनांची तीव्रता कायम राहली. मागील पाच वर्षांमध्ये तीन रूग्णालयातील उपचारांचा प्रवास करत हा तरूण अखेर सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात दाखल झाला.  या ठिकाणी धीरजला कोलेडोकोलिथीअ‍ॅसिस सोबतच कोलोडोकोलसिस्ट हा मूळ आजार असल्याचे निदान झाले. त्यासाठी पित्त नलिका पूर्णत: काढून छोटे आतडे थेट यकृताला जोडण्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. सिकलसेल आजाराने त्रस्त असणाऱ्या रूग्णांसाठी ही शस्त्रक्रिया अधिक जोखमीची असल्याची जाणीव शल्यक्रिया विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी येवला यांनी धीरजच्या आप्तांना करून दिली. मात्र धीरजने  शस्त्रक्रियेला संमती दिली.

डॉ. मिनाक्षी व त्यांचे सहकारी डॉ. पंकज घरडे, डॉ. अमित सिंग, डॉ. अझिम आलम, डॉ. सुधांशू नायक, डॉ. प्रतिक्षित रघुवंशी व हर्षल तायडे या शल्यचिकित्सकांच्या चमूने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे अन्यत्र कुठेही दहा लाखाहून अधिक खर्च अपेक्षित असणारी ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णत: मोफत करण्यात आली. पित्ताशयातील आणि त्याच्याशी निगडीत अन्य आजारावर उपचार करणारी या प्रकारची अद्यावत शस्त्रक्रिया साधने आणि तज्ञ शल्य चिकित्सक शासन संलग्न मोठ्या रूग्णालयातही क्वचितच आढळत असल्याचे तज्ञांचे मत आहे. मात्र सावंगीच्या रूग्णालयात सर्व सोयी असल्याने शस्त्रक्रिया पूर्णत: यशस्वी ठरल्याचे मत डॉ. येवला यांनी व्यक्त केले. सदर रूग्णाला भविष्यात त्रास होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.