News Flash

“फक्त लॉकडाऊन करून भागणार नाही”, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारवर निशाणा!

लॉकडाऊनसंदर्भात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला काही प्रश्न केले आहेत.

राज्यातल्या करोनाच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या परिस्थितीवर लॉकडाऊन हाच पर्याय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांशी चर्चा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ट्वीटरवरून एक व्हिडीओ पोस्ट करत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. तसेच, फक्त लॉकडाऊन लागू केला म्हणजे आपलं काम झालं, असं न करता सरकारला काही जबाबदाऱ्या देखील घ्याव्या लागतील, असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. राज्यात सध्या संपूर्ण लॉकडाऊन लागू न करता काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेल्या महिन्याभरात राज्यातली रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार की आहेत तेच निर्बंध अधिक कठोर केले जाणार? यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला सवाल केले आहेत.

“सरकारला जबाबदारी घ्यावी लागेल”

लॉकडाऊननंतर सरकारला जबाबदारी देखील घ्यावी लागेल, असं मुनगंटीवार या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. “लॉकडाऊनचा निर्णय तर्कावर आधारीत होईल. पण लॉकडाऊन करताना काही पथ्य ठेवावी लागतील. काही नियोजन करावे लागेल. सरकारला काही जबाबदारी घ्यावी लागेल. फक्त लॉकडाऊन केलं, की आपलं कार्य संपलं असा विचार सरकारने करू नये. विजेच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल, सर्वसामान्यांच्या संदर्भात पॅकेजचा निर्णय घेतला जाईल का? छोट्या उद्योगांचं काय होईल? महिन्याला इएमआय भरणाऱ्यांसाठी राज्य सरकार काही करणार आहे का? छोटे दुकानदार, फुटपाथवरील फेरीवाले, छोटे व्यापारी, छोट्या उद्येजकांच्या बाबतीत सरकारची काय भूमिका आहे? नगरपरिषद, महानगरपालिका यांच्या मार्केट-कॉम्प्लेक्समधल्या दुकानदारांना आपण दुकानं बंद करायला लावतो आहोत. त्यांच्या भाड्याच्या पैशांचं आपण काही करणार आहोत का? अशा अनेक मुद्द्यांवर सरकारने चर्चा करायला हवी”, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

 

“संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार”; उपमुख्यमंत्र्यांचं सूचक विधान!

अजित पवारांचं सूचक विधान!

दरम्यान, राज्यातल्या लॉकडाऊनविषयी समाजातल्या सर्वच स्तरामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींकडून लॉकडाऊनचं समर्थन केलं जात आहे तर काहींचा लॉकडाऊनला विरोध असून निर्बंधांची निवड केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात सूचक विधान केलं आहे. “लॉकडाऊन किंवा निर्बंध, जो काही निर्णय होईल, तो सगळ्यांसाठी सारखाच घ्यावा लागेल, वेगवेगळे निर्णय लागू करून चालणार नाही”, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यातील परिस्थितीत नेमका काय निर्णय घेतला जातो, याविषयी सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 6:20 pm

Web Title: sudhir mungantiwar asks government on lockdown in maharashtra pmw 88
टॅग : Corona
Next Stories
1 …तर मी पैसे खाणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं; उदयनराजेंचा ‘लॉकडाउन’विरोधात एल्गार
2 “संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार”; उपमुख्यमंत्र्यांचं सूचक विधान!
3 …तर सीरममधून लसीची एकही गाडी बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा मोदींना इशारा
Just Now!
X