महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आता दुर्मीळ प्रजातीचा पक्ष आहे अशी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढवता मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात प्रचार केला होता. एकूण दहा सभा घेऊन त्यांनी त्यात मोदींचे व्हिडिओ सादर करत त्यांना देशाबाबत कशी आस्था नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी द्या मात्र मोदी आणि अमित शाह यांना हटवा असंही आवाहन भाषणातून केलं. या सगळ्या सभांचा परिणाम होईल असं वाटलं होतं. मात्र तसं काहीही घडलं नाही. उलट भाजपाला प्रचंड बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा मोदीच देशाचे पंतप्रधान झाले. यानंतर राज ठाकरे यांनी फक्त अनाकलीनय एवढा एक शब्द ट्विट करून प्रतिक्रिया दिली.

आता राज ठाकरेंवर टीका करत मनसे हा दुर्मीळ प्रजातीचा पक्ष झाला आहे असा खोचक टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. लाव रे तो व्हिडिओ या राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे त्यांच्या सभा चांगल्याच गाजल्या. मात्र सभेला जमलेल्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होऊ शकलं नाही. आता महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेला टोला लगावला आहे. निवडणूक लढवायची नाही, राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा नाही. फक्त टीका करत रहायची हीच मनसेची ओळख बनली आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मोदी किंवा अमित शाह यांच्यावर टीका करण्यापेक्षा राज ठाकरे विकासाबाबत बोलले तर बरं होईल असंही वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं.

दरम्यान रावसाहेब दानवे यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाच्या नावाची चर्चा आहे असे विचारले असता भाजपामध्ये ते चर्चेअंती ठरेल असे त्यांनी म्हटले आहे. मला आदेश देण्यात आला तर मीदेखील प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.