09 December 2019

News Flash

वाहनचालकांना वनविभागाकडून सूचना

मेंढवण खिंडीत वन्यजीव अपघात रोखण्यासाठी फलक

मेंढवण खिंडीत वन्यजीव अपघात रोखण्यासाठी फलक; महामार्ग प्राधिकरणाचे मात्र दुर्लक्ष

नीरज राऊत, पालघर

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या मेंढवण खिंडीमध्ये वनविभागाने वन्यजीव या भागात वावरत असल्याचे सूचना फलक लावले आहेत. या भागात वारंवार होणाऱ्या वाहनांच्या अपघाताबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच या मार्गाची देखभाल करणाऱ्या आय.आर.बी. या संस्थेमार्फत वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारच्या सावधगिरीच्या उपाययोजना आखल्या गेलेल्या नाहीत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर-कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीवर मनोर गेट हॉटेलच्या पुढे त्याचप्रमाणे आशेरी गडावर जाण्यासाठी बस स्टॉपसमोर खडकोना येथे व महालक्ष्मी मंदिरापुढे धानोरी येथे ‘या परिसरात वन्यजीवांचा वावर आहे’ व हे प्राणी राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्याची शक्यता दर्शवत या भागातून वाहने हळू चालवण्याची सूचना या फलकांवर दर्शवण्यात आली आहे. हे फलक डहाणू उपविभागातर्फे लावण्यात आले असून त्याच्यावर मोफत संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मेंढवण खिंड हा वाइल्डलाइफ कॉरिडॉर असल्याने त्या परिसरात दाट व समृद्ध जंगल अस्तित्वात आहे. या परिसरात रानडुक्कर, ससा, भेकर, मोर, कोल्हा अशा वन्य प्राण्यांचा वावर आढळत असून ते रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्याची शक्यता आहे. अशा प्रसंगी कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून मेंढवण खिंडीत वनविभागाने वाहनचालकांना सावधगिरीचा इशारा म्हणून हे फलक  झळकवले असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये मेंढवण खिंड भागात वन्य प्राण्यामुळे या भागात अपघात घडला नाही. तसेच याच परिसरात बिबटय़ाचे साईटिंग किंवा पगमार्क   दिसून आलेले नाहीत. प्राणी गणना करताना या परिसरात मनोर परिक्षेत्रात रात्रगस्त करताना तसेच जनरल फिरती करताना जंगलामध्ये बिबटय़ा असल्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावे दिसून आले नसले तरी हे क्षेत्र वाइल्डलाइफ कॉरिडॉरअंतर्गत समाविष्ट असल्याने या भागात बिबटय़ाचा वावर दिसून येऊ  शकतो असे मनोर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी टी. पी. काळभोर यांनी सांगितले. वन्यप्राण्यांच्या तसेच वाहनचालकांच्या सावधानतेसाठी अशा प्रकारची फलकबाजी केली असल्याची भूमिका वनविभागाने घेतली आहे.

एकीकडे वनविभाग या क्षेत्रामध्ये वाहनचालकांच्या व वन्य प्राण्यांचे  अपघात होऊन जीवितास धोका टाळावा म्हणून सावधगिरीची उपाययोजना आखत असताना, अपघातप्रवण क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेंढवण खिंडीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपघात कमी करण्याच्या दृष्टीने कोणतीही विशेष उपाययोजना आखली नसल्याचे दिसून येत आहे. त्या परिसरात वळणाचा भाग सरळ करणे, चढण्याचा भाग सोपा करणे, वेगमर्यादा राखण्यासाठी गतिरोधक बसविणे, ब्लिंकर लाईट बसविणे, या क्षेत्रात दूरध्वनी सेवा पुरविणे इत्यादी मागण्या प्रलंबित आहेत. मेंढवण खिंडीच्या भागाला ब्लॅक स्पॉट जाहीर करून या भागात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्याची मागणी प्रलंबित आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर बसवण्यात आलेले टीव्ही कॅमेरे या क्षेत्रात नसून या पाच किलोमीटरच्या या पट्टय़ात मोबाइल दिवे नसल्याने या पट्टय़ात अपघात झाल्यानंतर मदतीसाठी संपर्क साधणेदेखील कठीण होत आहे. या भागात वाहन नादुरुस्त झाले किंवा अपघातग्रस्त झाले तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना नसताना या परिसरात वन्यजीव वावरत आहेत असे फलक लावण्यात आल्याने अपघातग्रस्त किंवा नादुरुस्त झालेल्या वाहनचालकांच्या मनामध्ये अधिक धडकी भरण्याची शक्यता आहे.

First Published on July 24, 2019 4:11 am

Web Title: suggestions from the forest department to prevent wildlife accidents zws 70
Just Now!
X