धुळे शहराजवळील मोराणे शिवारातील शेत जमीन हस्तांतरणात झालेल्या कथीत भ्रष्टाचाराच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने याठिकाणी मोठी खळबळ उडाली. रमेश शंकर चौधरी असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना पकडले. त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आवारात पोलिस तुकडी मानवंदनेसाठी उभी होत असतानाच अचानक रमेश शंकर चौधरी (वय ६५, रा.गोकर्ण हौसिंग सोसायटी, नकाणे रोड वलवाडी शिवार,धुळे) यांनी बाटलीत आणलेले रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले आणि आरडाओरडा सुरु केला. स्वतःला जाळून घेणार असल्याचे सांगत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित पोलिस कर्मचार्‍यांनी त्यांना त्वरीत रोखले. आणि त्यांना ताब्यात घेत त्याच्याकडील रॉकेलची बाटली, आगपेटी हिसकावली. या घटनेने काही वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ उडाला. आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या चौधरी यांच्याविरुध्द पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रमेश चौधरी यांनी आत्मदहन करण्याचा इशारा यापुर्वीच जिल्हाप्रशासनाला एका पत्राव्दारे दिला होता. मोराणे ता.धुळे येथील शेत गट नं. ७/४ हा पुर्वी सरकारी खारीखान म्हणून नोंद होता. सन १९८५ पासून या ठिकाणी रस्त्याच्या कडेला २४,५०० फुट जागेवर चौधरी स्पेअर पार्ट व हॉटेल व्यवसाय करीत आहेत. ही जमीन २०१३ मध्ये तत्कालिन अप्पर जिल्हाधिकारी अशोक करंजकर, तत्कालिन तहसिलदार शिवकुमार आवळकंठे, मंडळाधिकारी सोमनाथ बागुल तसेच प्रविण दंडवाणी व सागर चंद्रवान आहेर या लोकांनी संगनमत करुन बेकायदेशीररित्या महसुल अधिनियमन यांच्या अटी शर्तीचा भंग करुन हस्तांतरित करुन घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. या सर्व प्रकारात मोठा भ्रष्टाचार झाला असून आपल्यावर अन्याय केला जात असल्याचे सांगत चौधरी यांनी आज आत्मदहन केल्याचे पत्रात म्हटले आहे.