एसआरपीएफ सोलापूर गट दहा या बटालियनमधील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे (45) यांनी बुधवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास आपल्या सर्विस रिवाल्वरमधून डोक्यात गोऴी घालून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना धानोेरा पोलीस उपविभाग अंतर्गत येणा-या सावरगाव पोलीस मदत केंद्रात घडल्याने खळबळ उडाली आहे.

एसआरपीएफची तुकडी दोन महिण्यांपासून सावरगाव येथे कर्तव्यावर आहे. मूळचे सोलापूर येथील रहिवासी असलेले पोलिस उपनिरीक्षक शिंदे यात कर्तव्यावर होते. शिंदे हे कित्येक दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे कळते. त्यांना मागिल सहा  ते सात वर्षांपासून पाठीच्या कण्याचा गंभीर त्रास होता. त्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षली भागात तैनाती झाल्याने सतत ऑपरेशन मोडवर रहावे लागत असल्याने त्यांचा त्रास अधिक वाढत गेला असल्याने शारीरिक व्याधीला कंटाळून निराशेच्या गर्तेत त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येत आहेे.

दरम्यान सावरगाव पोलीसांनी मर्ग दाखल केला असुन तपास सुरू केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन असल्याने दिवंगत शिंदे यांचे पार्थिव त्यांचे मुळ गावी नेऊन अंतिम संस्कार केले जातील की स्थानिक ठिकाणी म्हणजे सावरगाव येथेच अंतिम संस्कार केले जातील असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र त्यांचे पार्थिवावर मुळ गावी नेऊन अंतिम संस्कार केले जातील असे सुत्रांकडून समजते.